काँग्रेसशी समझोता नसल्याचे संकेत, युतीवर प्रश्नचिन्ह
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपली पहिली 20 उमेदवारांची सूची घोषित केली आहे. गेले काही दिवस या पक्षाची काँग्रेसशी युती करण्यासंदर्भात चर्चा चाललेली होती. तथापि, ही युती होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसला आम्ही पुरेसा वेळ दिला. पण त्या पक्षाने युतीसंबंधी कोणतीही उत्सुकता दाखविली नाही, असा आरोप या पक्षाने केला आहे.
काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे दोन्ही पक्ष विरोधी पक्षांच्या देशव्यापी युतीचा भाग आहेत. तथापि, त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये एकमेकांच्या विरोधात संघर्ष केला होता. हरियाणा विधानसभा निवडणुकीत युती केली जाईल, अशी शक्यता होती. युतीसंबंधी चर्चा होत असल्याची माहिती दोन्ही पक्षांनी दिली होती. मात्र, जागावाटपावरुन अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सोमवारी होणार होती घोषणा
दोन्ही पक्षांच्या युतीची अंतिम घोषणा सोमवारी संध्याकाळपर्यंत होईल असे वक्तव्य आम आदमी पक्षाचे नेते राघव च•ा यांनी रविवारी केले होते. तथापि, सोमवारी संध्याकाळपर्यंत तशी कोणतीही हालचाल दिसून आली नाही. काँग्रेसने संध्याकाळपर्यंत काय तो निर्णय घ्यावा. अन्यथा आम्ही आमचे उमेदवार घोषित करु, असे पक्षाच्या नेत्याने सोमवारी दुपारी स्पष्ट केले होते. तथापि, सोमवारी संध्याकाळी पाच वाजता या पक्षाने 20 उमेदवारांची सूची घोषित केली आहे.
90 जागांवर लढण्यात तयार
अनेक जागांवरुन काँग्रेसशी आमचे मतभेद आहेत. त्यामुळे युती होणार नाही असे धरुन चालून आम्ही सर्व 90 जागांवर लढण्याची तयारी केली आहे. हरियाणात आमचा पाया भक्कम असून आम्ही चांगले यश मिळवू शकतो, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे हरियाणा प्रमुख सुशिल गुप्ता यांनी केले आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न
सोमवारी जरी युतीची घोषणा झाली नसली आणि युती होणार नाही, असे संकेत दिले गेले असले तरी दोन्ही पक्ष शेवटच्या क्षणापर्यंत युतीसाठी प्रयत्न करीत राहतील, असेही काही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. आम आदमी पक्ष काँग्रेसकडे 10 जागांची मागणी करीत आहे. तथापि, काँग्रेस पक्ष 5 जागाच देण्यास तयार आहे. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनीही युतीसंबंधी फारशी आशा नसल्याचे स्पष्ट केले आहे. आम आदमी पक्षाने घोषित केलेल्या 20 जागांवरील उमेदवारांमधील काही जागांवर काँग्रेसनेही उमेदवार घोषित केले आहेत, असे दिसून येत आहे.