बांदा :
बांदा राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक केल्याप्रकरणी चारचाकी वाहनासह १३ लाख २५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत रत्नागिरी येथील चालकाला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशिरा जुना पत्रादेवी-बांदा रोड, पंजाबी ढाब्याजवळ करण्यात आली.
इन्सुली कार्यालयातून मिळालेली अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जुना पत्रादेवी-बांदा रोड, पंजाबी ढाब्याजवळ, बांदा येथे शुक्रवारी सायंकाळी उशिरा अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीच्या संशयित वाहनांची तपासणी करत असताना एका चारचाकी वाहनाची (एमएच-०५/एस-७७५०) तपासणी केली असता वाहनाच्या मागील सीटवर व डिकीत गोवा बनावटीच्या विदेशी दारुच्या विविध बॅन्डचे ४२ बॉक्स अवैध मद्यसाठा आढळला.
या प्रकरणी वाहन चालक प्रथमेश दीपक भाटकर (२९, रा. तवसाळ, ता. गुहागर) याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत ३ लाख २५ हजार २०० किंमतीची दारू व १० लाखाचे वाहन असा एकूण १३ लाख २५ हजार २०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, विवेक कदम, धनंजय साळुंखे, जवान नि. वाहन चालक रणजीत शिंदे, जवान दीपक वायदंडे, जवान सागर सूर्यवंशी, जवान अभिषेक खत्री यांनी केली. या प्रकरणी अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करत आहेत.








