कळंबस्ते येथील घरावर पोलिसांचा छापा; मोठ्या पमाणात मिळाली गोवा बनावटीची दारू; एकावर गुन्हा, अद्याप अटक नाही
चिपळूण प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबस्ते-बौध्दवाडी येथील एका घरावर छापा मारून पोलिसांनी बुधवारी रात्री 9.30 वाजता 4 लाख 73 हजार 282 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. गेल्या आठवडाभरातील गोवा बनावटीची दारू जप्त करण्याची ही दुसरी मोठी कारवाई असल्याने असा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
राजाराम तानाजी जोईल (50, मुळगाव रत्नागिरी, सध्या पागनाका सिध्दी अपार्टमेंट चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद पोलीस नाईक कृष्णा दराडे यांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबस्ते-बौध्दवाडी येथील मधुकर गमरे यांच्या घरात गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा असल्याचे समजले. त्यानुसार बुधवारी रात्री 9.30 वाजता पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे, उपनिरीक्षक वंदना कनोजा, ज्योती चव्हाण, हे. काॅ. अतुल ठाकूर, गणेश शिंदे, वाघतकर, दराडे आदींच्या पथकाने या घरावर छापा मारला.
यावेळी घरात मोठा दारूसाठा असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता हे घर जोईल याने भाड्याने घेतल्याचे समजले. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यानंतर हा दारूसाठा 4 लाख 73 हजार 282 रुपयांच्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तो जप्त करण्यात आला. मात्र जोईल हा हजर असताना त्याला अद्याप अटक करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कळंबस्तेपाठोपाठची दुसरी मोठी कारवाई
काही दिवसांपूर्वी कळंबस्ते येथे कंटेनर पकडून सुमारे 24 लाख रूपयांची दारू जप्त करून एकाला अटक करण्याची मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे. त्या पाठोपाठ ही दुसरी मोठी कारवाई झाल्याने असा दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.