ट्रकमध्ये चोरकप्प्यांची निर्मिती : गोव्यातून गुजरातला वाहतूक, 25 लाखांचा ट्रकही जप्त, दोघा जणांना अटक
प्रतिनिधी / बेळगाव, खानापूर
बेकायदा दारू वाहतूक करण्यासाठी ट्रकमध्ये वेगळे कप्पे करून सहजासहजी कोणाला लक्षात येऊ नये अशा पद्धतीने तब्बल 27 लाखाचा दारूसाठा गोव्याहून गुजरातला नेणाऱ्या एका जोडगोळीला अब कारी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गुरुवारी सकाळी कणकुंबीजवळील सुर्ल क्रॉसजवळ ट्रकसह तब्बल 52 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अबकारी विभागाचे अप्पर आयुक्त वाय. मंजुनाथ, सहआयुक्त फिरोजखान किल्लेदार, उपायुक्त वनजाक्षी एम. यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी उपअधीक्षक रवी मुरगोड, निरीक्षक मंजुनाथ गल गली, बाळगौडा पाटील, दुंडाप्पा हक्की व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. गोव्याहून गुजरातला जाणारा साठा जप्त करण्यात आला आहे.

जी. जे. 03, बीटी 6735 क्रमांकाच्या ट्रकमध्ये बदल करून खास दारू वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र कप्पे करण्यात आले होते. एकदा दारूसाठा भरून वर फळ्या मारल्या की, सहजासहजी दारू वाहतुकीचा संशय कोणालाही येत नव्हता. मात्र, अबकारी अधिकाऱ्यांनी ट्रकमधील कप्पे उघडून 1 हजार 93.4 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. सुर्ल क्रॉसजवळ गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बाराचाकी ट्रक अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असल्याचा संशय आला. प्रदीपकुमार भगवती प्रसाद, रा. धनुही, श्रवस्ती, उत्तरप्रदेश व रामचंद्र रामनिहाल पाशीपूरवा, रा. इमराती, कुर्साडा, उत्तरप्रदेश या चालक व क्लिनरला अटक करण्यात आली आहे. या आरोपींना खानापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. अबकारी उपअधीक्षक रवी मुरगोड यांनी या दोघांवर सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. जप्त दारूसाठ्याच्या किंमत 27 लाख 52 हजार 398 रुपये इतकी होते. तर ट्रकची किंमत 25 लाख रुपये इतकी आहे.
चोरकप्प्यांत आढळला दारूसाठा
याबाबत बेळगाव अबकारी खात्याच्या उपायुक्त वनजाक्षी एम. यांनी माहिती देताना सांगितले की, गोव्याहून गुजरातला बेकायदा मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कणकुंबीजवळील अबकारी खात्याच्या नाक्याजवळ वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी जे. जी. 03-बी. टी. 6735 या बाराचाकी ट्रकची तपासणी करण्यात आली. मात्र या ट्रकमध्ये मागील हौदामध्ये एक कप्पा करुन मद्य वाहतूक करण्यात येत होती. कणकुंबी येथील नाक्यावर हा कप्पा उघडण्यासाठी अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यानी बराच प्रयत्न केला. मात्र कप्पा पूर्णपणे वेल्डींग करुन बंद केल्याने उघडता येत नव्हता. खानापूर येथील अबकारी कार्यालयाच्या आवारात हा ट्रक आणण्यात आला. बेकायदा दारू वाहतूक करण्यासाठी तयार करण्यात आलेले चोरकप्पे जेसीबीच्या साहाय्याने फोडण्यात आले. या चोरकप्प्यांत 27 लाख 52 हजार रुपयाचा दारूसाठा आढळून आले.









