सीसीबीची कारवाई : वेगवेगळ्या कंपन्यांचा 475 लिटर दारूसाठा जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
सदाशिवनगर येथे गोवा बनावटीचा बेकायदा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. सीसीबी व एपीएमसी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून 5 लाख 37 हजार 500 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी हरिष रमेश भस्मे (वय 35, रा. शेट्टी गल्ली) याला अटक करण्यात आली असून राजेश केशव नायक हा फरारी झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजेशवर यापूर्वीही अनेकवेळा कारवाई झाली आहे.
सीसीबीचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी एपीएमसी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. सदाशिवनगर येथील एका घरात हा साठा साठवून ठेवण्यात आला होता. वेगवेगळ्या कंपन्यांचा 475 लिटर बेकायदा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात कर्नाटक अबकारी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









