विविध मागण्यांसाठी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सनद नियम शिथिल करण्याची मागणी
बेळगाव : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी दी बेलगाम लिकर मर्चंट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश हलगेकर, सचिव मुरलीधर जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. किरकोळ मद्यविक्रीवर किमान 20 टक्के नफा द्यावा, अतिरिक्त अबकारी शुल्क कमी करावे, कोणत्याही परिस्थितीत सनद शुल्कात वाढ करू नये, सनद नियम शिथिल करावा, आदी मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले आहे.
ज्या ग्राहकांना बड्या हॉटेलमध्ये जाऊन मद्यसेवन करता येत नाही, अशा गरीब व मध्यमवर्गीयांसाठी सनद नियम शिथिल करण्याची गरज आहे. मद्य दुकानाच्या आवारात किंवा ठरावीक ठिकाणी पाकिटबंद खाद्यपदार्थ (स्नॅक्स) विक्रीसाठी सोय करून द्यावी, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्याचे प्रकार थांबणार आहेत. शेजारच्या राज्यात अशी व्यवस्था आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले असून सीएल-9 मधून पार्सलच्या माध्यमातून मद्यविक्री करण्यासाठी कायद्यात बदल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सीएल-2, सीएल-9 च्या वेळा सीएल-7 प्रमाणे सकाळी 9 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.









