वांगी :
वांगी (ता. कडेगाव) येथील कडेपूर रस्त्यालगत असणाऱ्या सरकारमान्य देशी दारूचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४० हजार रुपयांच्या दारुच्या बाटल्यासह इतर साहित्य चोरुन नेले आहे. ही घटना दि.४ एप्रिल रोजी घडली. याबाबत दुकानमालक शंकर तुळशीराम थोरात (रा.मलकापूर-कराड) यांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी, ४ एप्रिल रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकान बंद असल्याचे पाहून दुकानावरील पत्रा फिटिंग केलेले स्क्रू खोलून दुकानात प्रवेश केला. पूर्वेकडील दरवाजा उघडून दारुचे बॉक्स बाहेर काढले आहेत. यामध्ये टँगो कंपनीच्या ९० मि.ली.च्या ५०० बाटल्या आणि संत्रा कंपनीच्या ९० मी.ली.च्या ६०० बाटल्या चोरुन नेल्या आहेत. याशिवाय ५ हजार किंमतीचे सी.सी. टी.व्ही. किट आणि रोख रुपये २ हजार, असा एकूण ४० हजार १५० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेचा अधिक तपास स.पो.नि. राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संपत जाधव करीत आहेत.








