आम आदमी पक्षावर ईडीचा गंभीर आरोप, आरोपपत्र न्यायालयात सादर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मद्यसम्राटांना अनुकूल असे मद्यधोरण तयार करुन त्यांच्याकडून गैरमार्गाने मिळविलेल्या पैशाचा उपयोग आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी केला, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप प्रवर्तन निर्देशालयाने (ईडी) या पक्षावर केला आहे. निर्देशालयाने गुरुवारी येथे न्यायालयात मद्य घोटाळय़ातील आरोपपत्र सादर केले. त्यात हा आरोप करण्यात आला आहे.
दिल्लीत सहा महिन्यांपासून गाजत असलेल्या मद्य घोटाळा प्रकरणाने आता वेगळे वळण घेतल्याचे दिसत आहे. आम आदमी पक्षाने गेल्यावर्षी मार्चमध्ये झालेली गोवा विधानसभा निवडणूक चुरशीने लढविण्याचा प्रयत्न केला होता. जवळपास सर्व मतदारसंघांमध्ये त्या पक्षाने उमेदवार उभे केले होते. प्रचारही बराच पैसा खर्च करुन जोरदारपणे केला होता अशी चर्चा आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार दोन मतदारसंघांमध्ये विजयी झाले होते. या घटनाक्रमाचे धागेदोरे आता दिल्लीतील मद्यघोटाळय़ापर्यंत पोहचले आहेत, असे आरोपपत्रावरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे या पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
फेसटाईम कॉलवरुन चर्चा
या घोटाळय़ातील एक आरोपी विजय नायर याने इंडोस्पिरिटस् नामक मद्यकंपनीचे व्यवस्थापकीय संचालक समीर महेंद्रू यांची चर्चा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी घडवून आणली होती. ही चर्चा विजय नायर यांच्या फोनवरुन फेसटाईम व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून केली गेली. विजय नायर हा आपल्या विश्वासातील असून त्याच्या संपर्कात आपण रहावे आणि त्याच्या समवेत काम करावे असा संदेश केजरीवाल यांनी महेंद्रू यांना दिला होता. त्यानुसार व्यवहार करण्यात आले, असा आरोप ईडीने केला आहे.
70 लाख रुपये वाटले?
गोव्याच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाची स्थिती कशी असेल याचे सर्वेक्षण या पक्षाने केले होते. या सर्वेक्षणकार्यात समाविष्ट असणाऱया कार्यकर्त्यांना 70 लाख रुपये वाटण्यात आले होते. हे पैसे मद्यघोटाळय़ातून मिळालेल्या पैशांचा एक हिस्सा होता. विजय नायर हा आम आदमी पक्षाचा संपर्क प्रमुख होता. त्याने आम आदमी पक्षाच्या गोव्यातील प्रचाराशी संबंधित असणाऱया काही लोकांना रोख पैसे घेण्यास सांगितले होते. नायर याने आम आदमी पक्षाच्या वतीने आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँगेसचे खासदार मंगुटा श्रीनिवासलु रेड्डी, त्यांचे पुत्र राघव मंगुटा, अरबिंदो फार्माचे संचालक पी. सरथचंद्र रेड्डी, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची कन्या कविता कलवकुंतला यांच्या एका समूहाकडून 100 कोटी रुपयांची लाच घेतली होती, असा गंभीर आरोपही ईडीने केलेला आहे.
पैसा हस्तांतरीत कसा केला?
ही 100 कोटी रुपयांची रक्कम हैद्राबादचा एक उद्योगपती अभिषेक बाईनपल्ली याने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे सहकारी दिनेश अरोडा यांच्या साहाय्याने हस्तांतरीत केली. ती आम आदमी पक्षाला अशा प्रकारे मिळाली आहे, असा घटनाक्रम ईडीने सादर केलेल्या आरोपपत्रात विशद करण्यात आला आहे.
आरोप काल्पनिक : आप
ईडीने आरोपपत्रात नमूद केलेला सर्व घटनाक्रम केवळ काल्पनिक आहे, असा प्रतिदावा आम आदमी पक्षाने केला आहे. हे सर्व आरोप पक्षाच्या प्रतिमेची हानी करण्यासाठी लावण्यात आले आहेत. ईडीचा उपयोग केंद्रातील सरकार भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी नव्हे, तर आमदारांच्या खरेदीविक्रीसाठी करते. ईडीचे आरोपपत्र हास्यास्पद आहे, असेही म्हणणे आम आदमी पक्षाने मांडले आहे.
‘आप’च्या अडचणी वाढणार?
- ईडीने सादर केलेल्या आरोपपत्रामुळे आम आदमी पक्षाची कोंडी?
- पैशाचा माग शोधण्यात यश आल्याचा ईडीचा आरोपपत्रात दावा
- आम आदमी पक्षाकडून सर्व काल्पनिक आहेत असा प्रतिदावा









