राज्याला एटीएम समजते काँग्रेस : भूपेश बघेल सरकारवर जोरदार हल्लाबोल
वृत्तसंस्था/ रायपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी छत्तीसगडची राजधानी रायपूरचा दौरा करत 7 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन अन् शुभारंभ केला आहे. यानंतर आयोजित भाजपच्या विजय संकल्प सभेला मोदींनी संबोधित केले आहे. छत्तीसगडची निर्मिती भाजपने केली आहे. येथील लोकांच्या भावना भाजपच योग्यप्रकारे समजू शकतो. मागील निवडणुकीत काँग्रेसने गंगेची खोटी शपथ घेत दारूबंदी समवेत 36 आश्वासने दिली. या आश्वासनांच्या उलट येथील काँग्रेस सरकारने हजारो कोटींचा मद्य घोटाळा केला आहे. छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार हे भ्रष्टाचार आणि कुशासनाचे मॉडेल असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
छत्तीसगड या राज्याच्या निर्मिती भाजपची मुख्य भूमिका राहिली आहे. भाजपच येथील लोकांच्या गरजा जाणतो. छत्तीसगडच्या विकासासमोर एक मोठा पंजा भिंतीसारखा उभा राहिला आहे. हा काँग्रेसचा पंजा असून तो जनतेचा हक्क हिरावून घेत आहे. छत्तीसगडची लूट करण्याचा निश्चय काँग्रेसने केल्याची टीका मोदींनी केली आहे.
गंगेची खोटी शपथ घेण्याचे पाय
गंगामातेची खोटी शपथ घेण्याचे पाप काँग्रेसच करू शकते. गंगामातेची शपथघेत काँग्रेसने स्वत:चे घोषणापत्र जारी केले होते. या घोषणापत्राची आठवण करून देताच काँग्रेसची स्मरणशक्ती हरवून जाते. भ्रष्टाचाराशिवाय काँग्रेस पक्ष श्वासही घेऊ शकत नाही. भ्रष्टाचार ही काँग्रेसची सर्वात मोठी विचारसरणी असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
काँग्रेसकडून हजारो कोटींचे घोटाळे
छत्तीसगडमध्ये काँग्रेसने दारूबंदी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. 5 वर्षे उलटून गेली, तरीही याचा थांगपत्ता नाही. उलट काँग्रेसने छत्तीसगडमध्ये हजारो कोटीचा मद्यघोटाळा केला आहे. काँग्रेस पक्षासाठी छत्तीसगड जणू एका एटीएमप्रमाणे असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
काँग्रेसचे भ्रष्टाचाराचे मॉडेल
छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारच्या काळात कोल माफिया, वाळू माफिया आणि भू-माफियासह अनेक प्रकारचे माफिया उगवले आहेत. राज्यातील मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री अन् अधिकाऱ्यांवर घोटाळ्यांचे गंभीर आरोप होत आहेत. छत्तीसगडचे सरकार आता काँग्रेसच्या भ्रष्टाचार अन् कुशासनाचे मॉडेल ठरल्याचा दावा मोदींनी केला आहे.
मोदी म्हणजे भ्रष्टाचारावर कारवाईची गॅरंटी
विरोधी पक्ष माझी कब्र खोदणार असल्याचे धमकी देत आहेत. परंतु हा मोदी घाबरणारा नाही हे त्यांना माहित नसावे. विरोधी पक्ष हे भ्रष्टाचाराची गॅरंटी ठरत असतील तर मोदी भ्रष्टाचारावरील कारवाईची गॅरंटी असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. कलंकित नेते आता एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. परस्परांना पाण्यात पाहणारे नेते आता एकत्र येण्याचे निमित्त शोधू लागल्याचे म्हणत मोदींनी विरोधी पक्षांना लक्ष्य केले आहे.









