36 व्या वाढदिनी जगभरातून कौतुकाचा वर्षाव
वृत्तसंस्था/ ब्युनास आयर्स
एकविसाव्या शतकात फुटबॉल जगतात दोन नावांमध्ये नेहमी चर्चा केली जाते. ही दोन नावे म्हणजे अर्जेंटिनाचा लायोनेल मेस्सी व पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो. मैदानावरील खेळ असो नाहीतर लीग फुटबॉलमधील वर्चस्व, दोघांची नेहमीच तुलना होते. मात्र, ज्यावेळी जिंकलेल्या प्रतिष्ठेच्या ट्रॉफीजचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा मेस्सी सरस ठरतो. कारण, रोनाल्डोला न उंचावता आलेली फिफा वर्ल्ड कपची ट्रॉफी मेस्सीकडे आहे. अर्जेंटिनाचे 36 वर्षानंतर विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण करणारा मेस्सी आज 36 वर्षांचा झाला आहे. शनिवारी वाढदिनी फुटबॉलप्रेमींच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या मेस्सीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
अर्जेटिनातील रोझारियो येथे जन्मलेल्या मेस्सीच्या फुटबॉलपटू बनण्याची कहाणीही रंजक आहे. मेस्सी 13 वर्षांचा असताना बार्सिलोनाच्या नजरेत आला होता. वास्तविक, बार्सिलोना फुटबॉल क्लब प्रतिभावान खेळाडूंसाठी ‘टॅलेंट हंट प्रोग्राम‘ चालवत होता. त्यानंतर मेस्सीच्या वडिलांना कुठूनतरी याची माहिती मिळाली आणि त्यांनी बार्सिलोना एफसीशी संपर्क साधला. बार्सिलोना फुटबॉल क्लबचे स्पोर्टिंग डायरेक्टर कार्ल्स रेक्सॅक यांनी मेस्सीची प्रतिभा ऐकली होती. वयाच्या अवघ्या सातव्या-आठव्या वर्षीच त्याने फुटबॉलमध्ये नाव कमावलेले. हार्मोन्सची कमतरता असल्यामुळे त्याच्या उपचाराचा खर्च उचलण्याची जबाबदारी बार्सिलोना क्लबने घेतली. मात्र, या बदल्यात त्याने आमच्या क्लबसाठी खेळावे असे त्याच्या पालकांकडून क्लबने कबूल करुन घेतले. मेस्सी कुटुंब त्या शब्दाला जागले आणि बार्सिलोनाच्या एज ग्रुप संघापासून त्याने व्यावसायिक फुटबॉलला सुरुवात केली. 2004 मध्ये तो बार्सिलोनाच्या प्रमुख संघासाठी खेळू लागला.
बार्सिलोनावर अविरत प्रेम
मेस्सीचे बार्सिलोना क्लबवर खूप प्रेम आहे. 2004 ते 2021 पर्यंत तो या संघासोबत खेळला. 2021 मध्येही क्लब सोडण्याची इच्छा नव्हती, परंतु शेवटी मेस्सीला या क्लबमधून बाहेर पडावे लागले. मेस्सीने बार्सिलोनासाठी विक्रम केला. त्याने 778 सामन्यात 672 गोल केले. याशिवाय, बार्सिलोनाकडून खेळताना त्याने तब्बल 34 ट्रॉफी जिंकल्या.
अर्जेटिनाकडून खेळताना विश्वचषकाचे स्वप्न पूर्ण
मेस्सीने 2004 मध्ये अर्जेंटिनाकडून पदार्पण केले होते. 2023 पर्यंत त्याने संघाकडून खेळून 19 वर्षे पूर्ण केली होती. या कालावधीत चार वेळा विश्वचषक आणि पाच कोपा अमेरिका स्पर्धेत तो पराभूत झाला होता. गतवर्षी मात्र त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने पहिल्यावाहिल्या विश्वचषकाला गवसणी घातली. 2014 मध्ये स्वत:चे आणि संपूर्ण अर्जेंटिनाचे अधुरे राहिलेले स्वप्न त्याने 2022 मध्ये पूर्ण केले. कतार येथे झालेल्या या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सला पराभूत करत त्याने फिफाची ट्रॉफी उंचावली. यावेळी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार ही आपल्या नावे केला.
आता मेस्सी आपल्या कारकिर्दीच्या अखेरीकडे चालला आहे. बार्सिलोनानंतर पीएसजी व आता इंटर मियामी असा क्लब फुटबॉलचा प्रवास त्याने केला आहे. वयाच्या 36 व्या वर्षी जगभरात त्याची जादू कायम आहे. संपूर्ण जगभरात वाढदिनी जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. याशिवाय, अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी त्याला सरप्राईज गिफ्ट देत हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.









