31 मार्चनंतर दंडाच्या रकमेत होणार जबर वाढ
प्रतिनिधी/ बेळगाव
आधारकार्डला पॅनकार्ड नंबर लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे. त्यामुळे सध्या नागरिकांची पॅनकार्ड लिंक करण्यासाठीची धांदल सुरू आहे. यानंतर आधारकार्ड पॅनकार्डला लिंक करणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे. सरकारने तसेच सीबीडीटी म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने तीन ते चार वर्षांपूर्वी आधारकार्डच्या क्रमांकाच्या लिंकशिवाय पॅनकार्ड देणे बंद केले. मात्र अनेकांना त्याबद्दल फारशी कल्पना नव्हती.
यासाठी सरकारने आधारकार्डला पॅनकार्ड लिंक करण्यासाठी गतवर्षी सूचनावजा परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यावेळी 31 मार्च 2022 पर्यंतची मुदत दिली होती. तेव्हा ही प्रक्रिया विनामूल्य होती. पुढे सरकारने 30 जून 2022 पर्यंत मुदत वाढवून दिली. मात्र त्यावेळी 500 रुपये शुल्क आकारणी केली.
गतवर्षापर्यंत ज्यांनी आधार व पॅन लिंक केले, त्यांना 500 रुपये भरून आधारकार्ड लिंक करावे लागले. मात्र त्यानंतर सरकारने 31 मार्च 2023 ही लिंक करण्यासाठीची अंतिम तारीख असेल, असे जाहीर केले असून तसेच त्यासाठी हजार रुपये शुल्क लागू केले.
अर्थात ज्यांना याची कल्पना नव्हती व ज्यांचे आधारकार्ड पॅनशी लिंक नव्हते त्यांना हजार रुपये भरणे क्रमप्राप्त ठरले. 31 मार्चनंतर जर आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक केल्यास हजार रुपये शुल्काऐवजी लेट फी म्हणून दहा हजार रुपये भरावे लागण्याची शक्यता आहे.
जे ग्राहक 31 मार्चपूर्वी आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करत नाहीत त्यांना पुढे बँक, एलआयसी किंवा म्युच्युअल फंड आणि तत्सम आर्थिक संस्थांमध्ये व्यवहार करणे कठीण होणार आहे. त्यांचे खाते ब्लॉक होऊ शकते आणि पुन्हा सुरू करण्यासाठी आणि व्यवहार सुरळीत होण्यासाठी दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर आधारकार्ड पॅनकार्डला लिंक करावे व संभाव्य दंड टाळावा, अशी माहिती गुंतवणूक सल्लागार दत्ता कणबर्गी यांनी दिली.
लिंक….
आधारकार्ड पॅनकार्डला लिंक करण्यासाठीची वेबसाईट
https://www.incometax.gov.in//iec/foportal/









