गोगटे उपविजेते : पृथ्वी कंग्राळकर उत्कृष्ट खेळाडू
बेळगाव : सक्षम स्पोर्ट्स क्लब आयोजित सक्षम चषक आंतर महाविद्यालयीन सेवन ए साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लिंगराज महाविद्यालयाने गोगटे महाविद्यालयाचा 3-1 असा पराभव करून अजिंक्यपद मिळविले. सक्षम स्पोर्ट्स एरिनाच्या टर्फ फुटबॉल मैदानावरती या स्पर्धेत 12 संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात लिंगराजने वसंतराव पोतदार अभियांत्रिक महाविद्यालयचा 2-1 असा पराभव केला. लिंगराजतर्फे गौरव गोधवानी व सनन यांनी प्रत्येकी 1 गोल केला. तर वसंतराव पोतदारतर्फे अभिषेकने 1 गोल केला. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात गोगटेने शेख महाविद्यालयाचा 2-0 असा पराभव केला. गोगटेतर्फे वैभवने दोन गोल केले.
सायंकाळी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात लिंगराजने गोगटेचा 3-1 असा पराभव केला. सामन्याच्या 12 व्या मिनिटाला गौरव गोधवानीच्या पासवर सननने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 14 व्या मिनिटाला गोगटेतर्फे चिगरेच्या पासवर अभिषेकने गोल करून 1-1 बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. 22 व्या मिनिटाला संकेतच्या पासवर सननने दुसरा गोल करून 2-1 ची आघाडी लिंगराजला मिळवून दिली. 30 व्या मिनिटाला सननच्या पासवर गौरव गोधवानीने गोल करून जेतेपदावर शिक्कमोर्तब केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे संदीप सोमनट्टी यांच्या हस्ते विजेत्या लिंगराज व उपविजेत्या गोगटे संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू पृथ्वी कंग्राळकर, उत्कृष्ट गोलरक्षक वेदांत, उत्कृष्ट डिफेंडर मिंतनेश यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून कौशिक पाटील व संकेत पालेकर यांनी काम पाहिले.









