तालुक्यातील सुज्ञ नागरिकांतून मागणी : नियम धाब्यावर बसवून डॉल्बीचा दणदणाट : डॉल्बीमुळे आरोग्याच्या समस्या ऐरणीवर
वार्ताहर/सांबरा
तालुक्यामध्ये सध्या डॉल्बीचा दणदणाट वाढला आहे. त्यामुळे एक तर कर्णकर्कश डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा आणावी किंवा डॉल्बीवर बंदी घालावी, असा सूर सध्या तालुक्यातील सूज्ञ नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. यात्रा असो, हळद असो, लग्न असो किंवा कोणतीही मिरवणूक असो सर्वप्रथम डॉल्बीलाच युवकांची पहिली पसंती असते. योग्य आवाजात व योग्य वेळेमध्ये डॉल्बीचा वापर केल्यास नागरिकांची काहीही हरकत नसते. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून डॉल्बीचा मर्यादेपेक्षा जास्त आवाजात रात्री उशिरापर्यंत तालुक्यात दणदणाट सुरू असतो. त्यामुळे नागरिकांची अक्षरश: झोप उडाली आहे. डॉल्बीचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. डॉल्बीमुळे अनेकांच्या कानाला इजा पोहोचण्याचे प्रकार घडत असून याचा हृदय रुग्णांनाही धोका जाणवत आहे. तसेच डॉल्बीचा जनावरांनाही त्रास जाणवत असून अनेक जनावरांची शिंगे मोडल्याचे प्रकार घडले आहेत. तर अनेक दुभत्या जनावरांनी दुधाचे प्रमाण कमी केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने डॉल्बी वापरावर एक नियमावली जाहीर करावी किंवा डॉल्बीच्या वापरावर बंदी आणावी, असा सूर तालुक्यातील नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. डॉल्बीमुळे आपला समाज हिंदू संस्कृतीकडून पाश्चात्य संस्कृतीकडे वळल्याचे पहावयास मिळत आहे. हिंदू संस्कृतीकडे वळण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
प्रशासनाने दखल घेण्याची गरज
प्रशासनाने डॉल्बीच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची शहानिशा करावी व एक तर डॉल्बीवर बंदी आणावी किंवा डॉल्बी वापरासाठी एक नियमावली ठरवावी असा सूर सध्या नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे.
हलगा गावच्या डॉल्बी बंदीच्या निर्णयाचे सर्व थरातून स्वागत
अलीकडेच डॉल्बी वापराचे सर्व तोटे लक्षात घेऊन हलगा ग्राम पंचायतीने डॉल्बी मुक्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गाव डॉल्बीमुक्त झाले असून या निर्णयाचा शहर व तालुक्यातील सूज्ञ नागरिकांतून स्वागत करण्यात येत आहे. इतर गावांनीही हलगा गावचे अनुकरण करावे, असा सूर सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.
पारंपरिक वाद्यांना वेगळेच महत्त्व
हिंदू संस्कृतीमध्ये पारंपारिक वाद्यांना एक वेगळेच महत्त्व आहे. त्यामुळे कोणतेही सण उत्सवावेळी किंवा धार्मिक कार्यक्रमात सनई, टाळ मृदंग, भजन, लेझीम आदी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात येत होता. मधुर आवाजातील मंगलवाद्य ऐकताना सर्वांची मने प्रसन्न व्हायची व मंगलमय वातावरण निर्माण होत होते. या वाद्यांच्या गजरात सर्व सण उत्सव साजरे करण्यात येत होते. अलीकडच्या काळामध्ये या पारंपरिक वाद्यांना फाटा देत या वाद्यांची जागा डॉल्बीने घेतल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे आपली संस्कृती टिकवण्यासाठी सर्वांनी पुन्हा पारंपारिक वाद्यांकडे वळण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा
सध्या सुरू असलेल्या डॉल्बीच्या वापरामुळे वृद्ध लोकांना याचा त्रास जाणवत असून डॉल्बीमुळे हृदयघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा लहान मुलांच्या अभ्यासावर व आरोग्यावरही ही परिणाम होत असून डॉल्बीवर बंदी आणणे गरजेचे आहे. अतिउच्च आवाजात डॉल्बीचा वापर करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एक वेळ बँड चालेल पण डॉल्बी नको अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. आम्ही हिंदू म्हणून मिरवतो मात्र हिंदू धर्माचे पालन करत नाही. यासाठी शास्त्रानुसार पारंपारिक वाद्यांचाच वापर करावा.
-राजू देसाई, अध्यक्ष श्री देवस्थान कमिटी, सांबरा
डॉल्बी वापरासाठी नियमावली जाहीर करावी
डॉल्बीच्या अतिवापरामुळे आपली संस्कृती लोप पावत चालली आहे की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. टाळ मृदंग, लेझीम, भजन आदी आपली पारंपरिक वाद्ये युवा पिढी विसरत चालली आहे. यासाठी युवा पिढीने आपल्या पारंपरिक वाद्याकडे वळणे गरजेचे आहे. एक तर प्रशासनाने डॉल्बीवर बंदी आणावी किंवा डॉल्बी वापरासाठी एक नियमावली जाहीर करावी.
-नागेश देसाई, माजी जि. पं.सदस्य, सांबरा











