खुला बाजार विक्री योजनेत तांदळाचा समावेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अन्नधान्यांची महागाई कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून गव्हाचा साठा करण्यावर मर्यादा आणली आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये प्रथमच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच तांदळाचा समावेश खुला बाजार विक्री योजनेत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या साठ्यातून ठोक ग्राहके आणि व्यापारी यांना 15 लाख टन गहू विकण्याचाही निर्णय घेण्यात आला.
गेल्या एक महिन्यात गव्हाच्या दरात वाढ झाली आहे. बाजाराच्या पातळीवर ही दरवाढ 8 टक्के आहे. तथापि, ठोक आणि किरकोळ दरात इतकी वाढ झालेली नाही. याचाच अर्थ असा की व्यापाऱ्यांनी गव्हाचा साठा करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दक्षतेचा उपाय म्हणून साठ्यावर गव्हाच्या साठ्यावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती देण्यात आली.
गव्हाचे व्यापारी, ठोक आणि किरकोळ विक्रेते तसेच गव्हावर प्रक्रिया करणारे व्यावसायिक यांच्यावर 31 मार्च 2024 पर्यंत ही साठा मर्यादा राहणार आहे. मात्र, गव्हावरील आयात शुल्कात कपात करण्याचा सध्यातरी कोणताही विचार नाही. कारण सध्या देशात गहू पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. गव्हाच्या निर्यातीवरील प्रतिबंध मात्र पुढे सुरु ठेवला जाणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
तांदूळ खुल्या बाजारात
खुला बाजार विक्री योजनेत आता गव्हाबरोबरच तांदळाचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, किती तांदूळ या योजनेअंतर्गत उपलब्ध केला जाईल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच साखरेच्या निर्यातीला अनुमती देण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारसमोर नाही, असे अन्न विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









