आळंदी, पुणे / प्रतिनिधी :
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळय़ाच्या पूर्वतयारीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत आणि निर्मल व हरित वारीसोबत हा सोहळा वारकऱ्यांसाठी आनंददायी होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी येथे दिले. दरम्यान, आळंदीत प्रस्थान सोहळय़ातील गर्दीवर नियंत्रण आवश्यक असून, दिंडय़ातील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा आणण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी प्रांत गोविंद शिंदे यांनी आळंदीतील बैठकीत केल्या आहेत. त्यामुळे यंदा प्रस्थानाच्या वेळी दिंडीतील वारकऱ्यांची संख्या मर्यादित ठेवली जाण्याची चिन्हे आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयात आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळय़ाच्या पूर्वतयारीसाठी बैठक घेण्यात आली. बैठकीस पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा लड्डा आदी उपस्थित होते.
राव म्हणाले, राज्यभरातून आलेल्या वारकऱयांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जी-20 बैठकीसाठी 150 पेक्षा अधिक प्रतिनिधी यादरम्यान पुण्यात मुक्कामाला असणार आहेत. या प्रतिनिधींना राज्याच्या या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची माहिती देण्यात येणार आहे. पालखी मार्ग आणि पालखी तळावरील आवश्यक नियोजनासह रस्ते दुरुस्ती, सपाटीकरण, अतिक्रमण काढणे, वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे.
पालखी सोहळय़ासोबत वायरलेस यंत्रणा
मुक्कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही, 692 तात्पुरती शौचालये आणि 58 तात्पुरत्या स्नानगृहांची सुविधा करण्यात आली आहे. पालखीच्या स्वागताची तयारीदेखील करण्यात आली असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले. तर पालखी सोहळय़ासोबत वायरलेस यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आल्याचे फुलारी यांनी स्पष्ट केले.
नीरा नदीवरील पुलाची दुरुस्ती
सातारा जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, नीरा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. पालखी मार्गावर मदत केंद्र उभारण्यात येत आहे. पालखी तळावरील आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छता तसेच आरोग्य सुविधांबाबत नियोजन करण्यात आले आहे.
पालखी मुक्काम, रिंगण स्थळी आवश्यक सुविधा
सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, पालखी मुक्काम आणि रिंगणाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा करण्यात आली आहे. 31 आपत्ती प्रतिसाद केंद्र उभारण्यात येणार असून, नियोजनासाठी 9 स्वयंसेवी व सामाजिक संस्थांचे 1 हजार 900 स्वयंसेवक मदतीला असतील. संपूर्ण सोहळय़ादरम्यान 25 हजार 500 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. दर्शन रांगेचे नियोजन आणि लाईव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे, वारकऱयांच्या निवासासाठी 65 एकर क्षेत्रात नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
गर्दीवर नियंत्रण गरजेचे
याशिवाय आळंदीत नगर परिषदेत आळंदी देवस्थानचे प्रतिनिधी, दिंडीप्रमुख व अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात गर्दीवर नियंत्रण आणण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रस्थान सोहळय़ातील दिंडीतील वारकऱयांच्या संख्येवर मर्यादा आणण्याची सूचनाही या वेळी करण्यात आली.








