सायबर गुन्हेगारांची शक्कल, एपीके फाईलबाबत सावधानता गरजेची
प्रतिनिधी/ बेळगाव
दुबई येथील एका कंपनीच्या नावे ई-मेल पाठवून चुना खरेदीच्या व्यवहारातून बेळगाव जिल्ह्यातील येथील एका व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 18 लाखांना चुना लावला आहे. सायबर गुन्हेगारांचे उपद्व्याप सुरूच असून त्यामुळे व्यापारी, उद्योजकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकही हैराण झाले आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील एक व्यापारी चुन्याचा व्यापार करतो. दुबईतून तो विशिष्ट प्रकारचा चुना मागवतो. त्याने दुबई येथील कंपनीशी संपर्क साधून 800 टन चुन्याची ऑर्डर दिली होती. कंपनीने चुन्याच्या बदल्यात 18 लाख रुपये पाठविण्यास सांगितले होते. ई-मेलच्या माध्यमातून झालेल्या या व्यवहारावर सायबर गुन्हेगारांचे लक्ष होते. दुबई येथील चुना पुरविणाऱ्या कंपनीच्या नावे बोगस ई-मेल अकौंट सुरू करून त्या अकौंटवरून व्यापाऱ्याला मेल पाठविण्यात आला आहे. आमचा बँक अकौंट नंबर बदलला आहे, असे सांगत सायबर गुन्हेगारांनी दुसरा अकौंट नंबर दिला. या अकौंटवर पैसे जमा करा, लगेच माल पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले.
नेहमीचाच व्यवहार असल्यामुळे अकौंट नंबर बदलला असणार या समजुतीने बेळगाव जिल्ह्यातील व्यापाऱ्याने गुन्हेगारांनी दिलेल्या अकौंटवर रक्कम जमा केली. दोन दिवस उलटूनही कंपनीकडून कसलाच मेसेज आला नाही. म्हणून कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. तुम्ही दिलेल्या अकौंटवर दोन दिवसांपूर्वीच आम्ही पैसे पाठविले आहेत. माल कधी पाठविणार? अशी व्यापाऱ्याने विचारणा केली. दुबई येथील कंपनीच्या संचालकांनी दिलेल्या उत्तरामुळे व्यापाऱ्याला धक्का बसला. आमच्याकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मेल पाठविण्यात आला नाही. आमच्या कंपनीचे बँक अकौंटही बदलले नाही. तुम्ही कोणाच्या अकौंटवर पैसे पाठविला आहे, हे तपासा, असे सांगण्यात आले. त्यामुळे आपण फसलो गेलो याची व्यापाऱ्याला कल्पना आली.
व्हॉट्सअॅपवर ऑटो डाऊनलोडचे सेटींग सुरू असेल तर…
सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. एपीके फाईल पाठवून बँक खात्यातील रक्कम हडप करण्याच्या घटना वाढल्या आहेत. सर्वसामान्य बँक ग्राहकांना एपीके फाईलची कल्पना येत नाही. अनेकवेळा उच्चशिक्षितच अधिक प्रमाणात फसू लागले आहेत.
व्हॉट्सअॅपवर ऑटो डाऊनलोडचे सेटींग सुरू असेल तर एपीके फाईल आपोआप डाऊनलोड होते. यावेळी सहजपणे सायबर गुन्हेगारांना सावजाच्या बँक खात्यात घुसता येते. ऑटो डाऊनलोडचे सेटींग बदलले नाहीतर एपीके फाईलच्या माध्यमातून फसवणूक ही ठरलेलीच आहे, असे सायबर क्राईम विभागातील तज्ञांचे म्हणणे आहे.









