बेळगाव :
शहापूर येथील युनिकेअर हॉस्पिटलने भारतातील अत्यंत दुर्मीळ अशा अस्थिरोग शस्त्रक्रियेमध्ये यश मिळवून आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. 59 वर्षीय महिलेला उजव्या पायाच्या टिबिया (घोट्याजवळील हाड) भागात वाढत असलेला मोठा सेल ट्युमर असल्याचे निदान झाले होते. या दुर्धर स्थितीत तिचा पाय कापावा लागण्याची शक्यता होती. मात्र युनिकेअरच्या तज्ञ डॉक्टरांनी तिचा पाय वाचवण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची लिंब-सेल्व्हेज शस्त्रक्रिया केली. या प्रक्रियेत टिबियाचे विस्तृत रि-सेक्शन करून ट्युमर मेगा प्रोस्थेसिसच्या साहाय्याने पुनर्रचना केली गेली. ज्यामध्ये घोट्याच्या सांध्याचे पुनर्स्थापन देखील करण्यात आले.
अत्यंत जटिल अन् धोकादायक शस्त्रक्रिया यशस्वी
ही अत्यंत जटिल आणि धोकादायक शस्त्रक्रिया डॉ. पवन आलकुंटे आणि डॉ. अरविंद हम्पण्णावर या अस्थिरोग तज्ञांनी यशस्वीरित्या पार पाडली. रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, वेदनारहित चालण्यास त्या सक्षम झाल्या आहेत.
रुग्णाला चालण्यास सक्षम करणे टीमसाठी गौरवाची बाब
‘घोटा प्रोस्थेसिससह अशा प्रकारची लिंब-सेल्व्हेज सर्जरी भारतात फारच कमी वेळा झाली असून, ही शस्त्रक्रिया परवडणाऱ्या दरात पूर्ण करून रुग्णाला चालण्यास सक्षम करणे, ही आमच्या टीमसाठी गौरवाची बाब आहे. हे उत्तर कर्नाटकातील रुग्णांसाठी मोठे यश आहे.’ असे डॉ. पवन अलकुंटे म्हणाले.
या यशामुळे युनिकेअर हॉस्पिटलने पुन्हा एकदा गुंतागुंतीच्या अस्थिरोग उपचारांमध्ये आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. याआधी बेळगावमधील पहिले रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट युनिकेअरने यशस्वीपणे केले आहे. नियमितपणे हिप व नी रिप्लेसमेंट तसेच गुडघा, खांदा व घोटा यांच्या अॅर्थोस्कोपिक शस्त्रक्रिया केल्या जातात विशेष म्हणजे, युनिकेअर हॉस्पिटल हे बेळगावमधील एकमेव समर्पित बाल अस्थिरोग केंद्र असून, सर्व वयोगटांमध्ये संपूर्ण अस्थिरोग उपचार देण्याची बांधिलकी जपते.
बेळगावचे नाव आरोग्य सेवांच्या नकाशावर अधोरेखित
या दुर्मीळ आणि यशस्वी शस्त्रक्रियेने युनिकेअर हॉस्पिटलने केवळ प्रादेशिक स्तरावरील अस्थिरोग उपचारांच्या दर्जात भर घातली नाही, तर बेळगावचे नाव राष्ट्रीय स्तरावर आरोग्य सेवांच्या नकाशावर अधोरेखित केले आहे.









