उघडय़ा पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या
फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या
शोभा गुर्टू यांच्या आवाजातील हे गाणं रेडिओ किंवा आता ऑनलाइन रेडिओ आणि इतर कोणत्याही सोर्सवर ऐकलं की अनेक जणांच्या बाबतीत असं होत असेल की खरोखरच गतकाळातील स्मृती उफाळून येतात. आणि मनाला झालेल्या जखमाही तितक्मयाच दुःखद असतात आणि त्याही माणसाचा छळ करतात हे पटतं. या गाण्यात असलेलं उपमा सौंदर्य आणि भाव चित्तवेधक आहे यात शंका नाही पण शोभा गुर्टू यांच्या आवाजातच तो दर्द आहे की ज्यामुळे ऐकणाऱयाच्या भावना उचंबळून येतात. सर्वसाधारणपणे गाण्यासाठी प्रथमदर्शनी अनुकूल न वाटणाऱया किंवा जाडय़ाभरडय़ा वाटणाऱया त्या आवाजाचा परिणाम मात्र जबरदस्त आहे. कारण त्यात असणारं पराकोटीचं भावदर्शित्त्व! संगीतातल्या विद्वान व्यक्तींचं असं म्हणणं असतं की आवाजाच्या उंच पट्टीचा आणि पट्टीचं गाणं गाण्याचा तसा काही संबंध नसतो. म्हणजेच उंच पट्टीत गाऊ शकणाऱया माणसाचंच गाणं कानाला गोड लागतं असं काही नाही. किंबहुना तो समज जमीनदोस्त करण्यासाठीच शोभा गुर्टू, उषा उत्थुप किंवा शुभाताई मुद्गल यांच्यासारख्या गायिका जन्माला येत असतात. गोडवा, कमालीचा वजनदारपणा, दणकट तयारी आणि समोरच्या श्रोतृवृंदाची नस अगदी अचूक ओळखणे या सगळय़ा गोष्टी यांना अक्षरशः अवगत असतात. ठुमरी सम्राज्ञी म्हणून सुपरिचित असलेल्या आणि पद्मपुरस्काराने गौरवान्वीत असलेल्या शोभाताईंनी गायलेल्या अतिशय प्रसिद्ध गीतांमधलं हे एक सदाबहार गाणं! तारुण्याच्या ऐन भरात असताना जिवाला चटका लावून जाणाऱया काही घटना घडतात. तेव्हा त्याचे वण कधीही जात नाहीत. किंबहुना त्या जखमाही कधीच भरत नाहीत. आयुष्यात थांबायला वेळ नसतो. ते पुढे जातच असतं. त्यामुळे अशा दुःखद आठवणी बाजूला ठेवून रोजच्या जगण्यासाठी तयार व्हावं लागतं. पण ते घाव बुजलेले नसतात. कधीतरी असं काहीतरी घडतं की ज्यामुळे त्या सगळय़ा आठवणी उफाळून येतात. अस्वस्थ व्हायला होतं. आठवणी या दरवेळी सुखद नसतात. गतकाळातील प्रेमाच्या आठवणी जेव्हा अंगावर येतात तेव्हा त्या वादळासारख्याच वाटतात. म्हणूनच जेव्हा पी. सावळाराम लिखित हे गाणं कानावर पडलं की खरोखरच आपण वादळात सापडलो असं वाटत रहातं. हे पूर्ण गाणं ऐकवतच नाही एका बैठकीत. कारण त्यात उघडय़ा पुन्हा जहाल्या सारखे उसासे आणि विषादी स्वर नाहीच. त्यात दिसतो? काळरात्रीचा भयाण अंधार, समुद्रावर आलेलं घनघोर वादळ, गिळायला उठलेल्या परवतप्राय लाटा आणि वाऱयाचे महाभयंकर फटकारे….भीतीच वाटते. याचे संगीतकार दशरथ पुजारी यांनी ते वादळाचं? महाभयंकर वातावरण सुरातून असं काही निर्माण केलंय की एखाद्या लहान मुलाला भीतीने कापायला होईल आणि समदुःखी माणसाला त्याची भयानकता जाणवेल. नव्हे नव्हे हलवून सोडील.
प्रीत सागरी तुझ्या स्मृतींचे, गर्जत आले वारे वादळ
फिरू लागले जग वाटोळे, सुन्न मनाने मिटले डोळे
रात निराशा ओकीत काजळ..
वानगीदाखल हे एकच कडवं पुरेसं आहे. पूर्वीच्या पुस्तकातून केवळ काळय़ापांढऱया रंगात रंगवलेली पण अतिशय परिणामकारक असलेली चित्रं असत तसं चित्र डोळय़ांसमोर उभं राहतं. काळय़ा रंगातला कुट्टपणा दाखवण्यासाठी किती आणि कसकशी शब्दरचना केलीय! निराशा आणि काळेपणा यांचं नातं हे नेहमीचं. पण रात्र काजळ ओकत आहे हे किती बोलकं आहे! वादळाचे तडाखे बसलेलं जहाज भेलकांडत जातं, हेलकावे खातं हे अगदी स्पष्ट समोर दिसतं. जहाज फुटावं तसे मनोरथ चक्काचूर झाले. आता मला कुणीतरी हात द्या आणि या वादळापासून वाचवा असा आकांत कुणीतरी करतंय. आणि मग भल्यामोठय़ा सागरात एक अश्रूंचा ओघळ मिसळून जातो. आणि एवढय़ा वादळातही एक आशेचा किरण दिसतो तो म्हणजे लांबवर उभ्या असलेल्या दीपस्तंभाचा अनिरुद्ध दिसणारा प्रकाशझोत!
आठवणी इतक्मया भयंकर असतात? इतक्मया त्रासदायक असतात? नक्कीच हृदय पिळवटून टाकणाऱया असल्या पाहिजेत. कारण त्यावर कितीतरी प्रमाणात गाणी लिहिली गेली आहेत. जगातल्या सर्व भाषांमध्ये गतकाळातील कटु आठवणी जाग्या होणे या विषयावर गाणी लिहिली गेली असतील आणि लिहिली जातही असतील. कदाचित त्यामुळेच ती एवढी गाजली आहेत. एकेकदा असं होतं की एखादी वाईट घटना प्रत्यक्ष घडते त्यावेळी मन बधीर झालेलं असतं. पण नंतर मात्र जेव्हा जेव्हा त्या वाईट प्रसंगाच्या आठवणी येतात त्यावेळी बसणारा धक्का खूप जास्त असतो.
सौख्यात नांदताना का दुःख आठवावे?
जे नामशेष झाले त्या काय साठवावे?
हास्यात आजच्या या कळ कालची कशाला?
यमनमधलं हे गाणं सुखाला जोडलेली दुःखद आठवणींची किनार होऊन घडलं आहे. सुमन कल्याणपूर यांनी गाऊन खळेकाकांची ही ऐकायला सुंदर आणि गायला नेहमीप्रमाणेच महाकठीण असलेली चाल लीलया पेलली आहे. ‘हास्यात आजच्या या कळ कालची कशाला?’ असं म्हणणारी गृहिणी त्या भयावह आठवणीतून बाहेर आलेली नसावी बहुतेक. त्यामुळे ती मनाला समजावते की कटु आठवणी काढीत बसू नकोस.
कधीकधी आपल्या निघून गेलेल्या जोडीदाराची आठवण येते तर कधी असफल प्रेमाची आठवण येते. कधीतरी मुलंबाळं लांब जातात त्यांच्या आठवणी कडू होऊन छळत राहतात. कारण सगळेचजण काही बोरकर नसतात.
पिलांस फुटुनी पंख, तयांची घरटी झाली कुठेकुठे
आता आपुली कांचनसंध्या मेघडंबरी सोनपुटे
सले कालचीं विसरून सगळी भले जमेचें जिवीं स्मरूं,
शिशुहृदयाने पुन्हा एकदा या जगतावर प्रेम करूं.
असं म्हणायला! त्यासाठी आयुष्याकडे बघण्याचा प्रचंडच सकारात्मक दृष्टिकोन असावा लागतो. सर्वांना तो नाही झेपत. जुन्या काळच्या कडूगोड आठवणी त्रयस्थपणे पाहणं आणि पुन्हा एकदा आयुष्यावर नव्यानं प्रेम करणं अवघड असतं राजेहो! कारण
मधु मागसी माझ्या सख्या परी
मधुघटचि रिकामे पडती घरी
ही हताशा संस्थांनी राजकवी म्हणून असलेल्या भा. रा. तांब्यांनादेखील? चुकली नव्हती. आठवणींच्या विश्वात काही काही माणसं इतकी हरवलेली असतात की ‘आठवणींच्या फुलांनी जसे टांगले दिवस’ असं करुण गीत ती म्हणत असतात. मग ‘भेटणे तुझे ते नको बोलणेही आता, फार छळती मला हे तुझे, चांगले दिवस’ असं होतं. पण त्याच आठवणी जर पचवल्या, रुजवल्या तर त्यातून उत्तम उत्तम कलापुष्पांची निर्मिती होते. भावनांना हात घालणाऱया श्रुतिमधुर रचना घडतात. त्यातून पुन्हा कुणीतरी भावनिक होतं आणि पुन्हा काहीतरी नवनिर्मिती होतच राहणार असते. खरं ना?
-ऍड. अपर्णा परांजपे-प्रभू








