पालकमंत्री सतीश जारकीहोळी : नर्सिंग विद्यार्थ्यांचा प्रतिज्ञा कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
रुग्णांना आवश्यक असणारे वैद्यकीय उपचार देऊन त्यांना उत्तम स्वास्थ्य मिळवून देणे हे डॉक्टरांप्रमाणे परिचारिकांचेही कार्य श्रेष्ठ आहे. परिचारिकांच्या सेवेची दखल घेऊन त्यांचा समाजाकडून आदर झाला पाहिजे, असे मत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये (बिम्स) बी.एस्सी. नर्सिंग विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देणे व फ्लॉरेन्स नाईंटिंगेल यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम गुरुवार दि. 31 जुलै रोजी झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन करून पालकमंत्री जारकीहोळी बोलत होते. अध्यक्षस्थानी बिम्सचे संचालक डॉ. अशोक शेट्टी व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार असिफ सेठ उपस्थित होते. नर्सिंग विद्यार्थ्यांनी व्यावसायिक जीवनात निष्ठा, सोशिकपणा, एकाग्रतेने सेवा केल्यास बिम्स संस्था तसेच येथील प्राध्यापक व जिल्ह्याचेही नाव उज्ज्वल होईल. त्यामुळे समर्पण भावनेतून सेवा करीत राहावे, असे नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून पालकमंत्री म्हणाले. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर त्याचबरोबर नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
बिम्सचे संचालक डॉ. शेट्टी म्हणाले, मागील 15 वर्षांपासून नर्सिंगसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बिम्स दर्जेदार शिक्षण देत आले आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी बिम्सचे भरीव कार्य आहे. परिचारिकांनी वैद्यकीय सेवेतील आपली जबाबदारी समजून घेत कार्य करीत राहावे, अशी अपेक्षा बिम्सचे राजीव कृष्णमेत्री यांनी व्यक्त केली.
सुश्रुषेशिवाय वैद्यकीय सेवा पूर्ण होत नाही. त्यामुळे डॉक्टरांबरोबर परिचारिकांचेही कार्य महत्त्वाचे असल्याचे आमदार असिफ सेठ म्हणाले. कार्यक्रमाला जि.पं. मुख्य लेखाधिकारी परशुराम दुडगुंटी, बिम्सचे मुख्य प्रशासक सिद्दू हुल्लोळी, मुख्य लेखाधिकारी शिल्पा वाली यासह नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.









