कोल्हापूर :
चित्रपट तसेच मालिकांचे चित्रीकरण करण्यासाठी कोल्हापुरात चित्रनगरी, पन्हाळा, विशाळगड, न्यू पॅलेस, पंचगंगा नदी, भवानी मंडप आदी बेस्ट लोकेशन आहेत. निर्माता, दिग्दर्शकांना या लोकेशनची भुरळ पडली असून, कमी खर्चात चांगला चित्रपट किंवा मालिकेचीही निर्मिती कोल्हापुरात होत आहे. त्यामुळे कोल्हापुरात अनेक मालिका आणि चित्रपटांच्या चित्रिकरणाला वेग आला असून, चित्रनगरीतील थंडावलेल्या चित्रीकरणाला पुन्हा गती आलीय. त्याचबरोबर कोल्हापुरच्या चित्रनगरीला गतवैभव लाभत असून, चित्रनगरीत पुन्हा एकदा लाइट कॅमेरा, अॅक्शन‘चा माहोल गजबजू लागलाय. परिणामी स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ आणि कॅमेरामन यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
चित्रनगरीमध्ये सध्या आई तुळजाभवानी, ती कळी, जोडी तुझी माझी या मालिलकांसह रामानंद सागर यांच्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक निर्मार्ते, दिग्दर्शकांकडून लघुपट, गाण्यांचे चित्रिकरण सुरू असल्याने कलाकारांना चांगल्या रोजगाराच्या संधी मिळत आहेत. लाईटमॅनपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांच्याच हाताला काम मिळाले आहे. चित्रनगरीत सुरू असणाऱ्या मालिकांमधील वेशभूषा, केशभूषेसाठी लागणारे साहित्य कोल्हापुरकर पुरवतात. तसेच जेवन, राहण्याची सुविधा, लोकांची गर्दी यातूनही आर्थिक स्थिती सुधरत असल्याचे कलाकारांचे मत आहे. कोल्हापुरातील चित्रिकरणात जवळपास 2500 कलाकार आणि तंत्रज्ञ काम करीत आहेत. तसेच कॅटरिंग, हॉटेल, जनरेटर, लाईट, मेकअपमॅन, ड्रेस आणि लोकेशन्सलाही पैसे मिळत आहेत. एकूणच चित्रिकरणाच्या माध्यमातून अनेक घटकांना रोजगार मिळत असल्याने सर्व घटकांकडून आनंदाचे वातावरण आहे.
कलापंढरी म्हणून कोल्हापुरची देशभर ओळख आहे. इतर शहरापेक्षा कोल्हापुरात पंचगंगा नदी, दऱ्या खोऱ्या, पन्हाळा, शिवाजी विद्यापीठ, चित्रनगरी विशाळगड, राधानगरी, काळम्मावाडी धरणासह अन्य धरणे आहेत. अंबाबाई मंदिर, नरसोबावाडी अशी धार्मिक स्थळे आहेत. कलाकार, दिग्दर्शक यांच्या निवासासाठी कोल्हापुरात भरपूर चांगली हॉटेल्स आहेत.
उद्योग, व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने चित्रीकरणासाठी कोणतीही अडचण येत नाही. म्हणूनच अनेक निर्माते, दिग्तर्शकांचा मोर्चा कोल्हापूरकडे पुन्हा एकदा वळू लागला आहे. ऐवढेच नव्हे तर कोल्हापुरातील स्थानिक दिग्दर्शक, लेखक, निर्मात्यांनीही लघुपटासह चित्रपट निर्मिती करण्यात व्यस्त आहेत. यानिमित्ताने कोल्हापुरातील छोटे–मोठे कलाकार, तंत्रज्ञांसह अनेक घटकांना रोजगाराची संधी मिळत आहे. चित्रनगरी अद्ययावत होत असल्याने कोल्हापुरातील चित्रपट निर्मितीला उर्जितावस्था येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपट, मालिकांमधील कलाकारांसह अन्य घटकाकडून समाधान व्यक्त होत आहे.
31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सुचना
चित्रनगरीमध्ये अनेक लोकेशन, रस्ते, वाडा, चाळ पूर्ण झाली आहे. तर रेल्वेस्टेशन, वसतिगृह, बंगल्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे राज्य सरकारने 31 डिसेंबरपर्यंत ही काम पूर्ण करण्याच्या सुचना चित्रनगरी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे ही अपुरी काम युध्द पातळीवर पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.
चित्रनगरीत लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
चित्रनगरी चित्रिकरणासाठी सर्वोत्परी परिपूर्ण होत असल्याने निर्मार्ते, दिग्दर्शक लोकेशन पाहून जात आहेत. काही मालिका आणि चित्रपट कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने चित्रनगरीतील अपुरी काम पूर्ण करून, लवकरात लवकर सर्व सुविधा द्याव्यात.
मिलिंद अष्टेकर (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)








