उमरगा :
विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मराठवाड्यातील काही भागाला अवकाळी पावसाने तडाखा दिला. यामध्ये गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास वीज पडून चिंचोली जहागीर येथील तुकाराम माने यांच्या शेतातील एक बैल मृत्यूमुखी पडला तर एक बैल जखमी झाला आहे. काल दिवसभर उन्हाचा चटका आणि सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वातावरणात बदल होऊन शहरासह ग्रामीण भागात पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थंड हवेचा दिलासा मिळाला आहे. तर वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.








