शहरातील 200 हून अधिक ग्राहकांकडून सोलार रुफ टॉप पॅनेलद्वारे वीजनिर्मिती करून हेस्कॉमला अतिरिक्त विजेचीही विक्री
सुशांत कुरंगी /बेळगाव
धरणांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने दगडी कोळशाच्या साहाय्याने वीजनिर्मिती करण्यात येत आहे. विजेवरील वाढलेला भार कमी करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करण्याकडे सरकारने लक्ष पुरविले आहे. यामुळेच सोलारचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. बेळगाव शहरात 200 हून अधिक ग्राहकांनी सोलार रुफ टॉप पॅनेलद्वारे वीजनिर्मिती करून हेस्कॉमला अतिरिक्त वीजही विक्री करीत आहेत. वीजपुरवठा ठप्प होणे, भारनियमन, वाढीव वीजबिल यासारख्या कटकटीपासून दूर राहण्यासाठी सोलार रुफ टॉप योजना महत्त्वाची ठरत आहे. नागरिकांना आपल्या घर, सोसायटी अथवा उद्योगावर सोलार बसवून वीजनिर्मिती करता येऊ शकते. सरकारने काही मान्यताप्राप्त सोलार कंपन्यांना रुफ टॉप पॅनेल बसविण्याचे काम दिले आहे. अशा कंपन्यांशी संपर्क साधल्यास सरकारी अनुदान, सोलार रुफ टॉप बसविण्याचा खर्च, व्यवस्थापन या विषयीची माहिती मिळते.
सोलार रूफ टॉपसाठी 40 टक्के अनुदान
सोलार वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन सरकारकडून पुरविल्या जाणाऱ्या विजेवरील भार कमी व्हावा, यासाठी सोलार रुफ टॉपसाठी अनुदान दिले जाते. 3 किलोवॅट सोलार रुफ टॉपसाठी सरकारकडून 40 टक्के अनुदान दिले जाते. 4 किलोवॅटपासून पुढील रुफ टॉपसाठी प्रत्येकी 10 टक्के अनुदान दिले जाते. यामुळे महागडे सोलार पॅनल खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडते.
हेस्कॉमकडून खरेदी
शहरातील बऱ्याच विद्युत ग्राहकांनी आपल्या घराच्या अथवा उद्योगाच्या छतावर सोलार रुफ टॉप बसविले आहेत. घरगुती वापर करून शिल्लक असलेली वीज हेस्कॉमला विक्री करण्यात येते. रुफ टॉप सोलार पॅनेलला लावलेल्या नेट मिटरिंगमुळे शिल्लक वीज हेस्कॉमला देण्यात येते. ज्या ग्राहकांनी सरकारकडून अनुदान घेतलेले नाही अशा ग्राहकांकडून प्रतियुनिट 4 रुपये 92 पैसे तर अनुदान घेतलेल्यांकडून प्रतियुनिट 2 रुपये 90 पैसे दराने वीज खरेदी केली जाते. हा दर केईआरसीकडून निश्चित करण्यात येत असतो.
सोलार वॉटर हिटर वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ
आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी यापूर्वी लाकडाचा वापर करण्यात येत होता. परंतु लाकडापासून होणारा धूर व लाकडांची वाढलेली किंमत यामुळे वापर कमी होत गेला. मध्यंतरी वीज व एलपीजी सिलिंडरवर चालणारे वॉटर हिटर वापरणाऱ्यांची संख्या वाढली होती. परंतु गॅस व वीजदर गगनाला भिडणारे असल्याने यांचा वापर हळूहळू कमी होत गेला. त्यामुळे सध्या सोलार वॉटर हिटर वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 15 हजार रुपयांपासून क्षमतेनुसार सोलार वॉटर हिटर उपलब्ध आहेत. तसेच हेस्कॉमकडूनही सोलार वॉटर हिटर बसवून घेणाऱ्यांनाच वीज कनेक्शन देण्याची सक्ती केली असल्याने सोलारची संख्या वाढत आहे.
सोलार वॉटर हिटरवरील रिबेट बंद
सोलार वॉटर हिटरचा वापर वाढावा यासाठी हेस्कॉमकडून विद्युत बिलामध्ये रिबेट दिले जात होते. घरगुती विद्युत बिलामधून जास्तीत जास्त 50 रुपये वजा करण्यात येत होते. परंतु केईआरसीने जून 2023 पासून विद्युत बिलातील रिबेट बंद केले. सोलार वॉटर हिटर वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रिबेट देणे हेस्कॉमला परवडत नसल्याने योजना बंद करण्यात आली. यामुळे सोलार वॉटर हिटर ग्राहकांना पूर्ण विद्युत बिल भरावे लागत आहे.
प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न : विनोद करूर (प्रभारी कार्यकारी अभियंता, हेस्कॉम)
सोलार रुफ टॉप योजनेमुळे विद्युत ग्राहकांना फायदा होत आहे. विद्युत बिल कमी झाले असून हेस्कॉमला वीज विक्री केल्याने उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत आहे. शहरात विशेषत: मोठे उद्योग, इमारतींमध्ये सोलार रुफ टॉप बसविण्याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
सोलारमुळे प्रदूषण कमी : प्रफुल्ल रुगी (सोलार रुफ टॉप वापरकर्ते)
मागील 7 वर्षांपासून सोलार रुफ टॉप पॅनेलचा वापर करीत आहे. सोलारमुळे एकतर प्रदूषण कमी झालेच त्याचसोबत भारनियमन, वीज दरवाढ, हाय व्होल्टेज या समस्या कधीच जाणवल्या नाहीत. माझ्या घराला गरज आहे त्यापेक्षा तीनपट अधिक सोलार रुफ टॉपची क्षमता असल्याने पावसाळ्याच्या दिवसातही आजपर्यंत कधीच विजेचा प्रश्न निर्माण झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.









