वसुबारस झाली म्हणजे दिवाळीचे दिवस सुरू झाले असे म्हटले जाते. मात्र खऱया अर्थाने लक्ष्मीपूजनादिवशीच दिवाळीची सुरुवात होते. त्यामुळेच खऱया अर्थाने आजच्या दिवसापासून प्रकाश पर्वाला प्रारंभ होत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्या निमित्ताने आमचे वाचक, हितचिंतक आणि सर्व संबंधित घटकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारा प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद, आरोग्य आणि आपुलकी वाढवणारा ठरो. आपल्या संस्कृतीत सण आणि समारंभांना असलेले महत्त्व किंवा भारतीय माणसांची उत्सवांप्रति असलेली उदात्त भावना लक्षात घेतली तर आनंदाने जगायला आणि चांगल्या पद्धतीने सण साजरे करायला आपण नेहमीच उत्सुक असतो. घडणाऱया प्रत्येक घटनांचा साकल्याने विचार करून नव्या दिवसाला सुरुवात करायची तर काही औचित्य हे असावेच लागते. दिवाळी हे अशा संकल्पांसाठी एक उत्तम असे औचित्य ठरावे. अंधारावर मात करणारा प्रकाशपर्व म्हणून या सणाकडे पाहिले जाते. गत दोन वर्षांच्या कोरोना कालावधीला आता भारतीय समाज जवळपास विसरून गेला आहे. अत्यंत कठीण आणि खडतर परिस्थितीतून भारतीय समाजाने या काळात वाटचाल केली आणि त्यामुळेच आजचा हा सुंदर दिवस आपण सुखा समाधानाने आणि आनंदाने साजरा करू शकत आहोत. गत काही वर्षांमध्ये लक्ष्मीची पावले आता पुन्हा एकदा गतिमान झालेली असून ती समाजाकडे वळू लागली आहेत. श्रीमंतांच्या तिजोरीत राहण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या हातात खेळणे तिला पसंत पडेल असे धोरण या पुढच्या काळात अंमलबजावणीत आले तर ही दिवाळी अधिक आनंददायी होईल. उद्योग, व्यवसाय, व्यापाराला गती आली आहे. शेतीसारख्या क्षेत्रातील आव्हाने संपली नसली तरीसुद्धा तेथेही असेच किरण जागवणाऱया अनेक घटना घडलेल्या आहेत. सर्वसामान्यांचे उंचावत चाललेले जीवनमान आणि त्यांच्या चांगल्या जीवनाप्रती वाढत चाललेल्या अपेक्षा हे प्रगतीचेच लक्षण म्हटले पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात याबाबतीत देशाने बराचसा उहापोह केला आहे. आपण कुठे होतो, कुठे पोहोचलो, आपली वाटचाल कशी सुरू आहे, याबाबतीत देशातील धुरीणांनी या काळात बराचसा विचार केला. समाजासमोर विविध बाजू आल्या. प्रत्येक घटकांनी प्रगतीची आपली आपली दिशा कशी असेल या दृष्टीने मार्गदर्शन केले. कधी टीका तर कधी कौतुक अशा स्वरूपात आपल्या प्रगतीची आपण चर्चा केली. तशी ती घराघरात दोन-तीन पिढय़ांमध्ये सातत्याने सुरूच असते. सध्याच्या काळात जगणारी पिढी ही जगातील अनेक नव्या बदलांना प्रत्यक्ष साक्षीदार झालेली आहे. त्या अर्थाने ती मागच्या पिढय़ांपेक्षा अधिक अनुभवी आहे असे म्हणावे लागेल. अर्थात त्या अनुभवांना पक्क्या विचारांची जोड असेलच असे नाही पण प्रचंड गतिमान पद्धतीने बदलते जीवन पाहणारी ही पिढी ठरलेली आहे. एकाच आयुष्यात इतके प्रचंड बदल मानवी इतिहासाने फार कमीवेळा अनुभवले असतील. मात्र सध्याच्या फाईव्ह जी गतीच्या युगात सुख, शांती आणि समाधानासाठी पुन्हा पुन्हा प्रत्येक माणसाला आपली मुळेच शोधावी लागतात हे तितकेच सत्य आहे.

जगाच्या कानाकोपऱयात उंच भराऱया मारणाऱया आपल्या मुलाबाळांना आपली संस्कृती जपण्याचे आणि आपले सत्व टिकवण्याचे धडे देणाऱया गेल्या पिढीला या नव्या पिढीची प्रगती अचंबित करतेच. पण त्यांची विचारशैली ही आपल्याहून किती प्रगत आणि भिन्न पद्धतीची आहे, जी उद्दिष्टे आपण साध्य करू शकलो नाही ती यांनी किती गतीने साध्य केली, याचे मनोमन कौतुक वाटते तर कधी भितीही वाटून जाते. अशी ही पिढी या बदलांना सामोरे जाताना तितकीच सकारात्मक दिसते, हे या काळाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. अशा मिश्र विचारांनी भरलेल्या प्रत्येक कुटुंबातील सध्याचा काळ हा कुठे विचाराने प्रागतिक होणारा तर कुठे संक्रमणाची स्थिती असणारा आहे. त्या सर्वांच्यासाठीच दिवाळीचे हे पर्व म्हणजे एक सिंहावलोकन करण्याची, परस्परांना समजून घेण्याची संधी आहे. आपल्यापासून दूर राहणाऱयांना एकत्र येण्याची तर परतू न शकणाऱयांशी संवाद वाढवणारी ठरु शकते. सरस्वतीच्या आशीर्वादाने साधलेली शैक्षणिक प्रगती आणि त्या जोरावर उद्योग, व्यवसाय, नोकरीत मिळवलेल्या यशाच्या निमित्ताने घरात आलेली लक्ष्मी या दोन्हीचा संगम नवी पिढी अनुभवते आहे आणि जुनी पिढी ही त्याचा लाभार्थी बनलेली आहे. या बदलांना समजून घेताना लक्ष्मीचे महत्त्व आणि त्याचवेळी एकत्रित कुटुंब पद्धतीपासून ते व्यक्तीच्या समाधानापर्यंतच्या विविध बाबतीत घराघरात आज जी चर्चा घडताना दिसते आहे, त्यामध्ये वाट पाहण्याचे आणि पुढच्याला समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची गरज दिसत आहे. सण उत्सवाच्या निमित्ताने होणाऱया चिंतनात या समजून घेण्याला दोन्ही पिढय़ा महत्त्व देतील अशी आशा आहे. नव्हे समाजाचे ती गरजच बनलेली आहे. प्रकाशपर्व हा आशा अंधाऱया कोनाडय़ांना उजेडात आणण्यासाठीच उपयुक्त होत असतो. त्या दृष्टीने व्यक्तींच्या आणि समाजाच्या समोरील आव्हानांना चांगल्या पद्धतीने समजून घेता आले तर सणाचे औचित्य साधले असे म्हणता येईल. सण आणि उत्सवांच्या या मौसमामध्ये व्यापार उदीमात प्रगती करण्याची इच्छा असणारा वर्ग फार मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाला आहे. त्यामुळे घरगुती बरोबरच व्यावसायिक लक्ष्मीपूजनाचीही लगबग दिसून येणार आहे. चांगल्या काळाची सुरुवात होण्याची भावना व्यक्त करत एकमेकांना शुभेच्छा देण्याच्या या पर्वामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरणाचे दर्शन घडत राहो आणि असे वातावरण सदैव राहो याच शुभेच्छा.








