श्री बसव जयमृत्युंजय स्वामीजींचा इशारा : यत्नाळांवरील कारवाईने पंचमसाली समाजाला धक्का
बेळगाव : विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यावरील कारवाईमुळे पंचमसाली समाजात अस्वस्थता पसरली आहे. गुरुवारी जगद्गुरु श्री बसव जयमृत्युंजय स्वामीजींच्या नेतृत्वाखाली समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बेळगावात बैठक झाली. भाजपने बसनगौडा यांच्यावरील कारवाई त्वरित मागे घ्यावी. 10 एप्रिलच्या आत पक्षाने कारवाई मागे घेतली नाही तर 13 एप्रिल रोजी बेळगाव येथे राज्य पातळीवरील मेळावा भरवून राजकीय निर्णय घेणार असल्याचे स्वामीजींनी सांगितले. बसनगौडा पाटील-यत्नाळ हे राजकारणातील प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला नको होती. काही जणांच्या कुतंत्रामुळे कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मागे घेतली नाही तर उत्तर कर्नाटकात निश्चितच भाजपला फटका बसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदी नेत्यांनी त्वरित बसनगौडा यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणीही स्वामीजींनी केली.
पंचमसाली समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील बसनगौडा हे आघाडीचे नेते आहेत. भाजपने आरक्षण दिले नाही म्हणून आमचा समाज काँग्रेसच्या मागे राहिला. आता आमच्या समाजाच्या नेत्यावर कारवाई केली आहे. अशा परिस्थितीत समाज भाजपच्या मागे रहायचा का? याचा विचार सुरू आहे. आमचा लढा पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांविरोधात नाही. ज्यांनी आरक्षणाला विरोध केला, तेच या कारवाईमागे आहेत, असा आरोपही पत्रकारांशी बोलताना स्वामीजींनी केला. बसनगौडा यांच्यावरील कारवाईने समाजाला धक्का बसला आहे. याआधी पंचमसाली समाज भाजपच्या बरोबर होता. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी समाजाला आरक्षण दिले नाही म्हणून काँग्रेसकडे समाजाचा कल वाढला. काँग्रेसनेही आमची फसवणूक केली. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडे समाज वळत असतानाच त्यांच्यावर केलेली कारवाई धक्कादायक आहे. हायकमांडने ती त्वरित मागे घ्यावी, अशी मागणीही स्वामीजींनी केली. यावेळी निंगाप्पा फिरोजी, आर. सी. पाटील, गुंडू पाटील, शिवानंद तंबाके, राजू मगदूम, रामनगौडा पाटील यांच्यासह समाजाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.









