अन्यथा 20 रोजी रास्ता रोकोचा विविध ट्रक असोसिएशनचा इशारा : एकेरी वाहतूक सुरू करण्याची मागणी
वार्ताहर/रामनगर
अनमोड घाटातील गोवा हद्दीत रस्ता कोसळून अडीच महिन्याचा कालावधी उलटला तरी अजून कामाला प्रारंभ झाले नसल्याने विविध ट्रक असोसिएशन तसेच नागरिकांनी एकेरी मार्गाने अवजड वाहतूक सोडण्याची मागणी मडगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कोसळलेल्या ठिकाणी सुरक्षेततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करून लवकरच सर्व वाहनांना सोडण्याचे आश्वासन दिले होते. परंतु दि. 12 रोजी मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी अनमोड घाटमार्गावरून फक्त सहाचाकी वाहनांना सोडण्याचा आदेश दिल्याने त्याहून अधिक चाकी वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
मंगळवार दि. 16 रोजी रोजी गोवा तसेच कर्नाटक राज्यातील विविध ट्रक असोसिएशनच्या संघटनांनी रस्ता कोसळलेल्या ठिकाणी जमा होऊन आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत आम्हालाही या मार्गावरून सोडण्याची मागणी केली. अन्यथा दि. 20 रोजी पुन्हा याच ठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. त्यामुळे आता गोवा हद्दीतील अनमोड घाटातून दहाचाकी व त्याहून अधिक चाकी वाहनांना सोडण्याबाबत मडगाव येथील जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे आता सर्व वाहनधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.









