बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे ‘इंडिया’त अस्वस्थता
वृत्तसंस्था /मोतिहारी
‘जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत भाजपच्या नेत्यांसोबत माझे संबंध राहतील, सर्वजण मिळून काम करू, चिंता करू नका’ असे उद्गार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोतिहारी येथील केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांतविधी सोहळ्याला संबोधित करताना काढले आहेत. व्यासपीठावर उपस्थित भाजप नेत्यांकडे इशारा करत नितीश कुमार यांनी त्यांच्यासोबतचे संबंध आयुष्यभरासाठी असल्याचे म्हटले आहे. नितीश कुमार यांनी यावेळी नरेंद्र मोदी सरकारचे आभार मानले आणि यापूर्वीच्या मनमोहन सिंह सरकारवर टीका केली आहे. नितीश कुमार यांच्या या वक्तव्याचे आता अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने माझ्या म्हणण्याकडे साफ दुर्लक्ष केले. 2014 मध्ये केंद्रात नवे सरकार येताच माझ्या म्हणण्याला प्रतिसाद मिळाला. केंद्रात मनमोहन सिंह सरकार असताना 2007 मध्ये केंद्रीय विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा झाली होती. 2009 मध्ये संपुआ-2 सत्तेवर असताना केंद्रीय विद्यापीठ अधिनियम संमत करण्यात आला आणि याच्या अंतर्गत बिहारमध्ये विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन केंद्र सरकारकडे मोतिहारीमध्ये केंद्रीय विद्यापीठ सुरू करण्याची मागणी केली होती असे नितीश कुमार यांनी सांगितले.
मोतिहारी येथूनच महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात केली होती. मनमोहन सिंह सरकारने मी वारंवार मागणी करूनही विद्यापीठ सुरू करण्याची तयारी दर्शविली नाही. तत्कालीन शिक्षण मंत्र्यांची भेट घेतल्यावर त्यांनी जेवू घातले आणि मोतिहारीमध्ये केंद्रीय विद्यापीठ सुरू करण्यास नकार दिला. तत्कालीन केंद्र सरकारने गया येथे केंद्रीय विद्यापीठ सुरू करणार असल्याचे सांगितले होते असा दावा नितीश कुमारांनी केला आहे.
मोदी सरकारचे कौतुक
2014 मध्ये केंद्रात नवे सरकार येताच या दिशेने पाऊल उचलले गेले. 2016 मध्ये मोतिहारीमध्ये काम सुरू झाल्याचे नितीश यांनी म्हटले. यानंतर नितीश यांनी स्वत:च्या संबोधनात भाजपसोबतच्या मैत्रीचा उल्लेख केला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात आता अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. दीक्षांत सोहळ्यात उपस्थित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि भाजप खासदार राधामोहन सिंह यांच्याकडे इशारा करत नितीश यांनी हे सर्व जण साथीदार आहेत, कोण कुठे आहे हे महत्त्वाचे नाही. आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत, तोपर्यंत या लोकांसोबत माझे संबंध राहतील. असे उद्गार काढले आहेत.
नितीश कुमार यांच्याबद्दल संशय
इंडिया आघाडी विशेषकरून बिहारमधील संजदचा घटक पक्ष राजदमध्ये नितीश कुमार यांच्याबद्दल साशंकता असल्याचे मानले जात आहे. राज्य सरकारवरून दोन्ही पक्षांमधील चढाओढ पाहता संजद लवकरच राजदला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत नितीश यांनी भाजप तसेच मोदी सरकारचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना पेव फुटले आहे.









