अग्निशामक दलाची दमदार कामगिरी, जून महिन्यात फक्त 10 इंच पावसाची नोंद
वाळपई प्रतिनिधी
गेल्या 24 तासांमध्ये सत्तरी तालुक्यातील सहा ठिकाणी झाडे पडून जनजीवन विस्कळित झाले. कोणती प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र वीज खात्याच्या मालमत्तेचे नुकसान झाले. वाळपई येथे एका टाकीत पडलेल्या म्हशीला अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवदान दिले. चोर्ला परिसरामध्ये दोन ठिकाणी झाडे पडल्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतल्यामुळे वाहतूक त्वरित सुरळीत करण्याचा आली.
याबाबतची माहिती अशी की, पहाटे 6 वा. पर्ये येथील चेकपोस्ट जवळ झाड पडल्यामुळे रस्ता वाहतुकीला बंद झाला. सदर रस्ता दोडामार्ग या ठिकाणी जातो. झाड पडल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने धाव घेऊन रस्ता मोकळा केला. यामुळे वाहतूक सुरळीत झाली. दुपारी 13 वा.च्या सुमारास केरी चोर्ला मार्ग परिसरातील जांभूळ तिठ्याजवळ झाड पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. सदर झाड रस्त्यावर आडवे पडले होते. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने धाव घेऊन सदर ठिकाणी रस्ता मोकळा केला. दुपारी 12.40 वा. वाळपई येथील खान रेसिडेन्सी जवळ जंगली झाड पडल्यामुळे वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्ता मोकळा केला. दुपारी 3.30 वा. वाळपई ठाणे मार्गावरील लक्ष्मण हॉटेल जवळ गुलमोहराचे झाड पडल्यामुळे रस्ता बंद झाला व वीज वाहिन्यांचे नुकसानी झाली. सदर झाड तातडीने हटविण्यात आले. मात्र वीज वाहिन्यांची नुकसानी झाल्यामुळे सदर भाग व ठाणे भागातील परिसरातील वीज पुरवठा काही तास खंडित झाला. खात्याच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत तातडीने दुऊस्तीचे काम हाती घेतल्यामुळे वीज पुरवठा पूर्वपदावर आला.
दुपारी 4 वा. पाली येथे झाड पडल्यामुळे रस्ता बंद झाला ते त्वरित हटविण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानाकडून मिळालेल्या माहितीनुसार वाळपई कदंबा बस स्थानकांची एका सेप्टिक टँक मध्ये म्हैस पडून जखमी होण्याचा प्रकार घडला. याबाबतची माहिती दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन सदर म्हशीला जीवदान दिले.
दरम्यान शनिवारी दिवसभर सत्तरी तालुक्यात काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र पावसाचा जोर मात्र जास्त प्रमाणात दिसला नाही.
पावसाळा सुरू होऊन जवळपास एक महिना संपला मात्र अजूनपर्यंत पावसाने सत्तरी तालुक्याला हुलकावणी दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी असल्याचे आहे. गेल्या वर्षी जून महिन्याच्या शेवटपर्यंत जवळपास 26 इंच पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र अजून पर्यंत 10 इंच पाऊस झालेला नाही.









