रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज : पर्यायी मार्ग तयार करण्याची आवश्यकता
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकातील फूट ओव्हरब्रिजचे काम मागील महिन्याभरापासून सुरू आहे. यामुळे प्लॅटफॉर्म क्र. 2 व 3 वर पोहोचण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. बऱ्याचवेळा रेल्वे पकडण्यासाठी रेल्वे रुळावर उतरून धोका पत्करला जात आहे. वयोवृद्ध व महिलांना पायपीट करावी लागत असल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकात जुना फूट ओव्हर ब्रिज होता. परंतु तो ब्रिज केवळ प्लॅटफॉर्म क्र. 1 व 2 पुरता मर्यादित होता. याठिकाणी लिफ्टची सोयदेखील उपलब्ध होती. परंतु प्लॅटफॉर्म क्र. 4 पर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा दुसऱ्या फूटओव्हर ब्रिजवरून ये-जा करावी लागत होती. हे टाळण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने नवीन फूटओव्हर ब्रिज उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मागील महिन्याभरापासून हे काम सुरू आहे.
मुख्य फूट ओव्हरब्रिज नसल्याने प्लॅटफॉर्मच्या शेवटपर्यंत जाऊन पुन्हा प्लॅटफॉर्म 2 वर यावे लागत आहे. यामध्ये महिला व वयोवृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत. वेळेत रेल्वेपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे रुळावरून प्रवासी धावपळ करत आहेत. यामुळे अनेकवेळा लहान-मोठे अपघात होत आहेत. भविष्यात एखादा निष्पाप जीव जाण्यापूर्वी पर्यायी मार्ग तयार करणे गरजेचे आहे.









