महाराष्ट्रातील वनिता जगदेव बोराडे या सर्पमित्र म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आतापर्यंत 51 हजार सापांना जीवनदान दिलेले आहे. वनिता यांचे शिक्षण केवळ दहावी उत्तीर्ण इतकेच आहे. पशुविज्ञान शास्त्रातील कोणतीही पदवी त्यांच्याकडे नाही. तथापि, सर्पविषयक त्यांचे ज्ञान जगभरात मानले जात आहे. ज्ञान मिळविण्यासाठी पुस्तकी शिक्षणाची आवश्यकता नसते. त्यासाठी निर्धार आणि श्रद्धा लागते, असे त्यांचे मत आहे. याच निर्धाराच्या आधारावर त्यांनी सर्पविषयक सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त केले आहे. पर्यावरण संरक्षणातील सर्पांची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यामुळे सापांचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे, असे त्यांचे प्रतिपादन आहे. अन्य कुठेही नोकरी-धंदा करण्याऐवजी त्यांनी हे साप वाचविण्याचे व्रत अनेक वर्षांपासून अंगिकारले आहे. बालपणी आदिवासी मुलांबरोबर खेळता खेळता त्यांच्यात पर्यावरण संरक्षणाची जाणीव आपोआप निर्माण झाली. पृथ्वीवर माणसाला जगण्याचा जितका अधिकार आहे, तितकाच इतर सजीवांनाही आहे. साप हे इतर सजीवांप्रमाणेच आहेत. त्यांच्याबद्दल प्रचंड गैरसमज स्वतःला बुद्धिमान म्हणवून घेणाऱया मानवाने बाळगलेले आहेत. या गैरसमजातून सापांची हत्या अमर्याद प्रमाणात होते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोलही ढळतो, याची माणसाला कधीही जाणीव होत नाही, ही त्यांची व्यथा आहे.

सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात मुलींची लग्ने लवकर उरकली जातात, तसेच वनिता यांचे लग्नही लहानपणीच झाले होते. पण लग्नानंतरही त्यांनी आपले सर्पप्रेम कायम ठेवले. उत्तरोत्तर ते अधिक वाढत गेले. त्यांना त्यांच्या पतीचेही पूर्ण सहकार्य याकामी मिळते. अतिशय विषारी म्हणून ओळखल्या जाणाऱया सापांशीही त्या लीलया खेळू शकतात, हे पाहून त्यांचे पतीही आश्चर्यचकित होतात. न जाणो एखादा विषारी साप त्यांना चावला तर काय होईल, या चिंतेने त्यांना नव्हे तर त्यांच्या पतीला बहुतेक वेळेला सतावलेले असते. गेली 28 वर्षे त्या सर्पसंरक्षणाचे आपले व्रत चालवित आहेत. आतापर्यंत 51 हजारहून अधिक सापांना त्यांच्यामुळे जीवदान मिळाले आहे. यात विषारी आणि बिनविषारी अशा सर्व प्रजातींच्या सापांचा समावेश आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव प्रशासनानेही केला असून त्यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.









