सदाशिव आंबोशे,सेनापती कापशी
सहकारी साखर कारखानदारीतील दीपस्तंभ अशा कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा 46 वा वार्षिक अहवाल म्हणजे सहकार महर्षी स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांचा जीवन प्रवास उलगडणारा आहे.स्व.राजेंचे अगदी दुर्मिळ असे कारखाना उभारणीपासून ते या कारखान्याला उच्चतम शिखरावर नेऊन ठेवणारे दुर्मीळ फोटो अहवालाच्या सुरुवातीलाच पहावयास मिळतात.यातून राजेंच्या दूरदृष्टी आणि कार्यकर्तृत्वाचीही झलक आजच्या पिढीलाही पहावयास मिळतेय.
छत्रपती शाहू साखर कारखान्याची 46 वी वार्षिक सभा गुरुवारी 21 रोजी दुपारी 3 वाजता कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. त्यानिमित्त कारखान्याच्या 46 वा वार्षिक अहवालावर नजर टाकली आणि पहिली चार पानं न्याहाळताना स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आठवणी जाग्या झाल्याशिवाय राहत नाहीत.‘आठवण‘ स्व. राजेसाहेबांची…! या शिर्षकाखाली अहवालात फोटो घेतले आहेत.स्व.राजेंची अमृतमहोत्सवी जयंती आणि भारतीय स्वातंत्र्याचाही उत्साहात झालेला अमृतमहोत्सव अशा आनंद द्विगुणित करणाऱ्या बाबींची अगदी खुबीने अहवालात सुरुवातीलाच नोंद घेतल्याने अहवालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
काळ होता 1978-80 चा… यामध्ये कारखान्याचा भूमिपूजन व पायाभरणी,पहिला बॉयलर अग्निप्र्रदीपन,ऊस मोळीपूजन,पहिल्या साखर पोत्याचे पूजन,कारखान्यातून बाहेर पडलेल्या पहिल्या साखरेचे बैलगाडीतून वाटप,कारखान्याला विविध मान्यवरांची भेट,कारखान्याला मिळालेला पहिला सन्मान आणि त्यानंतर स्व.राजेंच्या नेतृत्वाखाली कारखान्याला गेल्या 46 वर्षात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मिळालेले 67 पुरस्कार,शिक्षण संकुल, कारखाना मुख्य कार्यालय प्रांगणातील छ. शाहू महाराज पुतळा अनावरण अशी विविध छायाचित्र अहवालामध्ये पाहिल्यानंतर स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखान्याने केलेली नेत्रदीपक प्रगती पहावयास मिळते.आजच्या घडीला तीच परंपरा ‘शाहू‘ ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे पुढे चालवत आहेत.आजही कारखान्याला कोणत्या ना कोणत्या तरी बाबतीत दरवर्षी पुरस्कार ठरलेलाच आहे.
छ. शाहू साखर कारखान्याची वार्षिक सभा वैशिष्ट्यापूर्ण असते.सभेत प्रचंड शिस्त, नीटनेटकेपणा असतो. सहकारामध्ये सभासद त्या संस्थेचा मालक असतो.पण खराखुरा मालक आहे, हे छ. शाहू साखर कारखान्याच्या वार्षिक सभेतच पहावयास मिळते.कारण येथे येणाऱ्या सभासदाला सन्मानानं सभेसाठी बोलावले जाते,तिथे त्यांना सन्मान दिला जातो.त्यासाठी कारखान्याची खास यंत्रणा आधीपासूनच कामाला लागलेली असते.अनेक सहकारी संस्थेच्या वार्षिक सभा वेगळ्या अर्थाने चर्चेत येतात.पण ‘शाहू‘ची सभा विना पोलीस बंदोबस्ताची होते. इथं नियोजन परफेक्ट होते.ठरल्या वेळेत यत्किंचितही बदल होत नाही.अशी ही वार्षिक सभा पार पडते.
कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी लावलेली शिस्त आजही पहावयास मिळते.वार्षिक सभेत काही नियमावली असते. त्याला कोठेही बगल न देता सभेचे कामकाज सुरळीत पार पडते.स्व.विक्रमसिंह घाटगे यांचे सभेला संबोधीत करणारे भाषण सभासद आवर्जून ऐकायला यायचे..! वार्षिक सभा, कारखाना, साखर उद्योगाव्यतिरिक्त एक वाक्य नव्हे तर एक शब्द देखील राजे उच्चारत नव्हते, इतका त्यांचा काटेकोरपणा होता. मात्र त्यामध्येही त्यांच्या भाषणातील विनोदी शैलीने सभागृहात हास्याचे फवारे उठायचे.इतका त्यांचा वार्षिक सभेवरही कमांड होता. राजे नेहमी म्हणायचे, हा कारखाना सहकाराचे मंदिर आहे. इथे येताना राजकारणाचे जोडे बाहेर काढूनच यायचे..! म्हणूनच ‘शाहू‘ सहकारातील आदर्श आहे.









