वृत्तसंस्था/मेरठ
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात दोन आरोपींना ऑनर किलिंगच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. या दोन आरोपींनी त्यांच्या नातेवाईक तरुणीचा प्रियकर असलेल्या दीपक त्यागी याची हत्या केली होती. हे आंतरधर्मिय प्रेमातून उद्भवलेल्या हत्येचे प्रकरण आहे. शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे. फमीद अहमीद आणि मोहम्मद असीफ अशी असल्याची माहिती देण्यात आली. अहमीद याच्या मुलीचे आणि हत्या झालेल्या दीपक त्यागी याचे प्रेमसंबंध होते. तथापि, अहमीद याचा या संबंधांना विरोध होता. त्याने 26 सप्टेंबर 2022 या दिवशी त्यागी याला आपल्या घरी पिण्याच्या निमित्ताने आमंत्रित केले. त्यागी याला बरीच दारु पाजण्यात आली. मद्य पिऊन तो बेहोश झाल्यानंतर अहमीद आणि त्याचा सहकारी असीफ यांनी त्याला बाजूच्या झाडीत नेले.
तेथे या दोघांनी त्याचा तलवारीने शिरच्छेद केला. त्यागीचे मस्तक त्यांनी या स्थळापासून 5 किलोमीटर अंतरावर नेऊन टाकले. या घटनेनंतर दोन दिवसांनी त्यागीचा मृतदेह घटनास्थळी आढळून आला. नंतर काही काळात त्याचे मस्तकही सापडले. हत्या करण्यात आलेले शस्त्रही हस्तगत करण्यात आले. 3 ऑक्टोबर 2022 या दिवशी दोन्ही आरोपींना, त्यागी याच्या वडिलांनी सादर केलेल्या तक्रारीनुसार अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर हत्या करणे, पुरावा नष्ट करणे आणि कटकारस्थान करणे अशा गुन्ह्यांखाली अभियोग चालविण्यात आला. मेरठचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नुसरत खान यांनी दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली. त्याच प्रमाणे दोन्ही आरोपींना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.









