वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीतील 23 वर्षीय छायाचित्रकार अंकित सक्सेना याच्या हत्येप्रकरणी मुस्लीम कुटुंबातील 3 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. सक्सेना याने एका मुस्लीम युवतीशी रिलेशनशीप केल्याने तिच्या कुटुंबातील तिघांनी त्याची निर्घृण हत्या सहा वर्षांपूर्वी केली होती. हे प्रकरण देशभर गाजले होते. या प्रकरणी मोहम्मद सलीम, अकबर अली आणि शहनाझ बेगम यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच त्यांना 50 हजार रुपये दंडही करण्यात आला असून तो सक्सेना याच्या कुटुंबियांना दिला जाणार आहे. या प्रकरणी आरोपींचे वय लक्षात घेऊन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली नाही, असे न्यायलयाने स्पष्ट केले आहे. सरकारी पक्षाने फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. सक्सेना याच्या कुटुंबियांचीही तीच मागणी होती. त्यामुळे त्यांच्याकडून आता उच्च न्यायालयात अपेल केले जाण्याची शक्यता आहे. अंकित सक्सेना याची हत्या आंतरधर्मिय विवाहामुळेच करण्यात आली होती, हे उपलब्ध पुराव्यांवरुन स्पष्ट होते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शिक्षा झालेले अपराधी हे युवतीचे जवळचे नातेवाईक आहेत. हे ऑनर किलिंगचे प्रकरण होते.









