केरळच्या विशेष एनआयए न्यायालयाचा निर्णय : यापूर्वीच दहाजणांना शिक्षा
वृत्तसंस्था /थिरुवनंतपुरम
केरळ आणि देशभरात 13 वर्षांपूर्वी गाजलेल्या प्राध्यापकाचा हात तोडण्याच्या प्रकरणात कोची येथील विशेष न्यायालयाने सहा आरोपींपैकी तिघांना जन्मठेपेची कठोर शिक्षा दिली आहे. इस्लाम धर्माच्या विरोधात कृती केली अशा समजुतीने कट्टर धर्मवादी असणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या इस्लामी संघटनेच्या काही हस्तकांनी हे कृत्य केले होते. प्राध्यापकाचे नाव टी. जे. जोसेफ असे आहे.ही घटना 4 जुलै 2020 या दिवशी घडली होती. प्रा. जोसेफ हे न्यूमन महाविद्यालयाचे प्राध्यापक होते. हे महाविद्यालय इडुक्की जिल्ह्यातील थोडूपुझा येथे आहे. हात तोडण्याच्या आरोपाखाली पीएफआयच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा दहशतवादाशी संबंधित गुन्हा असल्याने त्याची चौकशी एनआयएकडे सोपविण्यात आली होती. आरोपींवरील आरोप सिद्ध झाल्याने विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश अनिल के. भास्कर यांनी साजिल, नासर आणि नजीब या तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.
युएपीए अंतर्गत चौकशी
आरोपींविरोधात कठोर युएपीए या कायद्यातील तरतुदी लागू करण्यात आल्या होत्या. याशिवाय स्फोटकविरोधी कायदा आणि भारतीय दंडविधानातील तरतुदीही लागू करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाच्या प्रथम टप्प्यात 10 आरोपींना युएपीए अंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी आणखी तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. या तिघांनी हात तोडण्याचा गुन्हा प्रत्यक्ष केल्याने त्यांना सर्वाधिक शिक्षा करण्यात आली आहे. या तिघांनी अन्य चार लोकांसह प्रा. जोसेफ यांना 4 जुलै 2020 या दिवशी त्यांच्या घरातून ओढून बाहेर काढले आणि त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांना जबर मारहाण केली आणि नंतर त्यांचा उजव्या हाताचा तळला तोडला असा त्यांच्यावर आरोप होता. आरोपींचा हेतू जोसेफ यांना ठार करण्याचा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.









