बेळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोक्सो न्यायालयाने गुरुवार दि. 20 रोजी जन्मठेपेची शिक्षा आणि 26 हजार रुपयांचा दंड ठेठावला आहे. आनंद दुर्गाप्पा गोल्लर (वय 23) रा. मलप्रभानगर वडगाव असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. आरोपी आनंद हा 3 ऑगस्ट 2023 रोजी अल्पवयीन मुलीच्या घराकडे कोणी नसताना गेला होता. मुलीच्या घरासमोर असलेल्या नळाला हातपाय धुण्यासाठी मुलीला 10 रुपये देऊन तिला दुकानातून शॅम्पू आणण्यास सांगितले. त्यानंतर तिच्याकडे एक ग्लास पाणी देण्याची मागणी केली. पाणी आणण्यासाठी मुलगी घरात गेल्यानंतर तिच्या पाठोपाठ आरोपीदेखील आत शिरला. त्यानंतर दरवाजा आतून बंद करत आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याची वाच्यता कुठे केल्यास चाकूने भोसकून खून करण्याची धमकी दिली.
ही माहिती पालकांना समजताच एपीएमसी पोलीस ठाण्यात पीडितेच्या कुटुंबीयांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून घेऊन आरोपीला अटक केली. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या गुन्हा दाखल अधिकारी त्रिवेणी नाटिकार आणि तपास अधिकारी विश्वनाथ काब्बुरी यांनी तपास करून पोक्सो न्यायालयात दोषारोप दाखल केला होता. न्यायालयात 10 साक्षी, 46 पुरावे आणि 15 मुद्देमाल तपासण्यात आले. त्यावेळी आरोप सिद्ध झाल्याने आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि 26 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचबरोबर तिला जिल्हा कायदा प्राधिकरणाकडून 4 लाख ऊपयांची आर्थिक भरपाई देण्याचा आदेशही बजावला. सरकारतर्फे अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.









