50 हजारांचा दंडही; तिघांची निर्दोष मुक्तता
► वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते चमन भाटी यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपी रणदीप भाटी, कुलवीर भाटी, योगेश डबरा आणि उमेश पंडित यांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने चौघांना जन्मठेपेसह 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर जोगेंद्र जुगला, योगेंद्र लाला आणि हरेंद्र यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात कडक फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
समाजवादी पक्षाचे नेते चमन भाटी यांची 24 एप्रिल 2013 रोजी ग्रेटर नोएडातील डाबरा गावात घरात घुसून आरोपींनी हत्या केली होती. या प्रकरणात रणदीपसह सात आरोपींची नावे समोर आली होती. या हत्याकांडानंतर गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निषेध केला. चमनच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान रजेवर गेलेल्या दिवशी हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी घराभोवतीच्या भिंतीवरून चढून चमन भाटी यांच्या घरात घुसून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. संपत्तीच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले होते.









