प्रतिनिधी/ मडगाव
दीपाली मेता या 20 वर्षीय युवतीच्या खून प्रकरणासंबंधी मडगावच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने तळपण-सादोळशे (काणकोण) येथील 30 वर्षीय चेतन उर्फ विजयेंद्र आरोंदेकर याला शनिवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश विन्सेंत डिस्ल्वा यांच्या न्यायालयाने शनिवारी हा निवाडा दिला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील डी. एम. कोरगावकर यांनी काम पाहिले. कुंकळी पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी या खून प्रकरणाचा यशस्वी तपास केला होता आणि या तपासावर आधारुन न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार 20 वर्षीय दीपाली मेथा ही मूळ माजाळी -कारवार येथील. गोव्यात ती तळपण -काणकोण येथे राहात होती. वरील आरोपीने तिच्याकडे मैत्री केली. तिला काब दे राम किल्ला, खोल -काणकोण येथे घेऊन गेला आणि तिचा गळा दाबून खून केला. खुनानंतर आरोपी तेथून पळून गेला.
32 साक्षीदार
सरकारपक्षाने या खून प्रकरणासंबंधी न्यायालयात एकूण 32 साक्षीदारांची साक्ष नोंद करुन घेतली. मयत दीपाली मेथा हिची आई सरिता मेथा, मयताची आजी यशोदा केळूस्कर, मयताची बहिण रुपाली मेथा, मयताचे वडिल श्रीधर मेथा, मयताचा मामा निलेश गोकर्णेकर, आरोपीचा शेजारी नंदेश ठक्कर यांचा साक्षीदारात समावेश होता.
डॉ. सुनिल चिंबोलकर यांनी मयत दीपाली मेथा हिच्या मृतदेहाची शवचिकीत्सा केली होती. डॉ. मंदार कंठक यांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी केली होती. या सर्वाची इतर साक्षीदारांसह न्यायालयात साक्ष झाली.
न्यायालयात या खाटल्याची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयापुढे सवाल होता. आरोपीने दीपाली मेथी हिचा गळा दाबून खून केला हे सरकारपक्ष न्यायालयात सिद्ध करु शकले का?
आरोपीच्या वकिलानी न्यायालयात युक्तिवाद करताना या खून प्रकरणात एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही. ही केस पूर्णताः परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारुन आहे असे स्पष्ट केले.
दीपाली मेथा बेपत्ता असल्याची पोलीस तक्रार मयताच्या आईने पोलीस स्थानकात केली होती.
काणकोण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक त्यावेळी फिलोमेना कॉश्ता होते. मयत दीपालीचा मृतदेह काणकोण पोलीस स्थानकाच्या हृद्दीत सापडला होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक कॉश्ता यांनी मयताच्या प्रियकराला ताब्यात घेण्याची सुचना आपल्या सहकाऱयांना केली तेव्हा काणकोण रेल्वे स्थानकावरुन आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते आणि नंतर चेतन उर्फ विजयेंद्र आरोंदेकर याला रितसर अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीला कुंकळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते असे न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात म्हटलेले आहे.
न्या. डिसिल्वा यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. साक्ष व पुरावे यावर आधारुन न्यायालयाने आरोपी चेतन उर्फ विजयेंद्र आरोंदेकर याला दीपाली मेथा हिचा खून केल्याच्या आरोपावरुन दोषी ठरविले आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. शिवाय आरोपीने 50 हजार रुपयांचा दंड भरावा आणि दंडाची ही रक्कम न भरल्यास आणखी दोन वर्षाची कैदेची शिक्षा भोगावी असे न्यायालयाने आदेशात म्हटलेले आहे.
आरोपीने दंडाची 50 हजारांची रक्कम भरलयास ती रक्कम मयताच्या आइंला देण्यात यावी असेही न्यायालयाने आदेशात म्हटलेले आहे.









