डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या २०१३ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी पुण्यातील न्यायालयाने आज दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य तीन आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अंधश्रद्धा निर्मृलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा आज निकाल जाहीर झाला. या प्रकरणामध्ये शरद काळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना दोषी ठरवण्यात आलं असून अन्य तिघाजण वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळकर आणि विक्रम भावे यांच्यावर आरोप सिद्ध न झालेने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) पी. पी. जाधव यांनी, सचिन अंदुरे आणि शरद काळसकर यांच्याविरुद्ध खून आणि कट रचण्याचे आरोप सिद्ध झाले असून त्यांना जन्मठेप आणि 5 लाख रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) च्या म्हणण्यानुसार अंदुरे आणि काळसकर यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. न्यायालयाने आरोपी डॉ. विरेंद्र तावडे, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पुण्यात दाभोलकर यांच्या हत्येनंतर फेब्रुवारी 2015 मध्ये गोविंद पानसरे आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये कर्नाटकामध्ये प्रसिद्ध लेखक एम.एम. कलबुर्गी यांच्यावर गोळीबार झाला होता. तर सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची सप्टेंबर 2017 मध्ये बेंगळुरू येथील त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
या निकालानंतर प्रतिक्रिया देताना या निकालामुळे काही अंशी समाधान लाभले असले तरी काही आरोपींना निर्दोष सोडल्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचं म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पानसरे यांनी डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, आणि गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये समान धागा आहे. यांच्या हत्येमागे कोण आहे हे समोर आलेच पाहिजे असं मत व्यक्त केलं.