वाहतुकीच्या गोंगाटामुळे हृदयविकाराची शक्यता
प्रदूषण जगातील सर्वात मोठी समस्या ठरत चालली आहे. वायू प्रदूषणाप्रमाणेच ध्वनी प्रदूषण देखील घातक ठरत आहे. परंतु याकडे अधिक लक्ष दिले जात नाही. प्रत्यक्षात ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आयुर्मान कमी होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार वायू प्रदूषणानंतर ध्वनी प्रदूषण हे आजारांचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे.
युएनच्या अहवालात शहरी ध्वनी प्रदूषणाला पर्यावरणासाठी निर्माण झालेला सर्वात मोठा नवा धोका ठरविण्यात आले आहे. पॅरिस हेल्थ एजेन्सीच्या अहवालानुसार पॅरिसमध्ये राहणाऱ्या लोकांची आर्युमान ध्वनी प्रदूषणामुळे कमी होत आहे. त्यांचे सरासरी आयुर्मान 10.7 महिन्यांनी कमी झाले आहे.
झोपमोड करणाऱ्या आवाजांना क्रॉनिक साउंड्स म्हटले जाते. अशा आवाजांमुळे त्रास होत असतो, याहून अधिक म्हणजे हायपर टेन्शन, हृदयविकाराचा धक्का यासारख्या आजारांसाठी ते कारणीभूत ठर आहे. महामार्गानजीक राहणाऱ्या लोकांना दिवसभर गाड्यांचा आवाज ऐकावा लागतो, अशा लोकांना याची सवय झालेली असते. याचमुळे हा आवाज त्यांना अधिक त्रासदायक वाटत नाही, परंतु त्यांचे शरीर अशा आवाजांवर प्रतिक्रिया देत असते. शरीरातील इतर आजारांची तीव्रता यामुळे अनेक पटीने वाढत असते.

तर कुठल्याही शांत भागात म्हणजेच गाव, शहराबाहेरील वस्त्यांमध्ये राहणारे लोक अचानक कधीकधी निर्माण होणाऱ्या तीव्र आवाजांमुळे त्रस्त होतात आणि त्यांचे शरीर अधिक प्रमाणात प्रतिक्रिया देते.
अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या अध्ययनात तीव्र आवाजांमुळे शरीरात अनेक रसायने रिलिज होऊ लागतात असे आढळून आले आहे. ही रसायने नर्वस सिस्टीमला प्रभावित करतात, हृदयाच्या ठोक्यांचा वेग तसेच रक्तदाब वाढत असतो. वाहतुकीच्या गोंगाटात अधिक काळ राहणाऱ्या लोकांना 5 वर्षांच्या आत हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता अत्यंत अधिक असते.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार 53 डेसिबलपेक्षा अधिक वाहतुकीचा आवाज अन् 45 डेसिबलपेक्षा अधिक विमानाचा आवाज माणसाला आजारी करू शकतो. अमेरिकेतील एक तृतीयांश लोकसंख्या सदैव अशाप्रकारच्या आवाजांच्या सान्निध्यात असते.









