– विविध ठिकाणी झाडांची पडझड
– पर्वरी, पिळर्ण येथे रस्त्यावर वडाचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प
– झाडे कापण्यास अग्निशामक दलाचे अथक परिश्रम
– गिरी भागातील शेती पाण्याखाली
प्रतिनिधी / म्हापसा
सलग दोन दिवस धो–धो पडलेल्या पावसामुळे बार्देश तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. विविध ठिकाणी झाडांची पडझड झाल्याची नोंद अग्निशामक दलाच्या पर्वरी, म्हापसा, पिळर्ण कार्यालयात झाली आहे. पिळर्ण येथे साळगाव उतरणीवर भले मोठे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने सकाळपासून येथील रस्ता दोन्ही बाजूनी ये–जा करण्यास बंद ठेवला. दरवर्षीप्रमाणे गिरी येथील शेती पूर्णत: पाण्याखाली गेली. तसेच गिरी शाळेजवळ रस्त्यावर दोन्ही बाजूला पाणी भरल्याने वाहने हाकताना पाणी जाऊन बंद पडली. तसेच मधोमध मोठा खड्डा पडल्याने गावातील युवकांनी रस्त्याच्या मधोमध झाड लावून धोक्याची सूचना दिली.
गुऊवारी सकाळपासूनच धो–धो पाऊस सुरू होता. पर्वरी दमानिया दि गोवाच्या उतरणीवर असलेला भव्य पुरातन वडाचे झाड रात्री 12.30 वाजण्याच्या दरम्यान रस्त्यावर अमटून पडल्याने ये–जा करण्यास रात्री मुख्य रस्ता अडकून पडला. सर्व गाड्यांची भली मोठी रांग लागली. घटनेची माहिती पर्वरी अग्निशमन दलास दिल्यावर उपअधिकारी ओंकार कारबोटकर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी झाड कापून बाजूला केले.
सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान साळगाव पिळर्ण दरम्यान वाहतूक करणाऱ्या रस्त्यावर दत्तमंदिर जवळ पुरातन भले मोठे वडाचे झाड उन्मळून आडवे झाल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे कळंगूट व साळ गावमार्गे वाहतूक वळविण्यात आली. या भागातील वीज तारा तुटून पडल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. दिवसभर वीज खात्याचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करीत होते.
गिरी बार्देश येथे इमारतीवर पावणे नऊ वाजता इमारतीवर भले मोठे भेंडीचे झाड पडले. कोलवाळ मानसजवळ रस्त्यावर तसेच शिवोली–मार्ना पंचायतीजवळ घरावर भेंडीचे झाड पडले. सकाळी सव्वा अकरा वाजता साखळेश्वर मंदिर बंदीरवाडा शापोरा येथे वीज पुरवठा खंडित झाला. दुपारी वेर्ला–काणका कृष्ण मंदिराजवळ जंगली झाड रस्त्यावर पडले. दोन वा. दरम्यान तार–शिवोली येथे बाबाजी कोल्ड्रींग जवळ आंब्याचे झाड रस्त्यावर पडले असता म्हापसा अग्निशामक दलाने कापून बाजूला केले.
म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी क्रिष्णा पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत शेटगावकर, योगेश आमोणकर, स्वप्नेश कळंगुटकर, विश्वनाथ कोरगांवकर, हितेश परब, दिलीप सावंत, संजय फडते, परेश मांद्रेकर यांनी झाडे कापून बाजूला केली. पिळर्ण अग्निशामक दलाचे उपअधिकारी ओंकार कारबोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश गावडे, सचिन गावकर, महादेव नाईक, महेंद्र नाईक, रोहन सावंत यांनी पर्वरी वडाजवळ पडलेले वडाचे झाड कापून बाजूला केले. तसेच दिवसभर आंब्याची झाडे, फणसाची झाडे पडली असता ती जवान सलीम शेख, एप्रिमो डायस, लक्षदीप हरमलकर, विलास मोरजकर, विजय गावस, रोहन नाईक यांनी कापून बाजूला केली.









