स्मार्ट सिटीच्या कामांमुळे वाहनांना त्रास घरांवर पडली झाडे, दरडी कोसळल्या झाडे पडून तारा तुटल्याने वीज खंडित
प्रतिनिधी / पणजी
शेकडो कोटी ऊपये किंमतीचे ’स्मार्टनेस’चे ऊपडे चढवलेल्या पणजी शहराची पहिल्याच पावसाने अक्षरश: दाणादाण उडविली असून गेल्या तीन दिवसात ज्या प्रकारे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला ते पाहता या सिटीमध्ये ’स्मार्ट’ काहीच नसल्याचे उघड झाले आहे. गुऊवारी अविश्रांत कोसळलेल्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले, वाहतूक कोंडी झाली, अनेक ठिकाणी वृक्ष कोसळून मालमत्तांची नुकसानी, वीजपुरवठाही खंडित झाला, अशा घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले.
गुऊवारी सार्वजनिक सुट्टीमुळे सरकारी कर्मचारी आणि विविध कामांसाठी येणाऱ्या लोकांची संख्या कमी होती. त्यामुळे शहरातील वर्दळ बऱ्याचअंशी नियंत्रणात असल्याने फार मोठा परिणाम जाणवला नाही.
अनेकांच्या घरांत, दुकानांत पाणी
बुधवारी 24 तासात तब्बल 8 इंच कोसळलेल्या पावसाने राजधानीत खास करून 18 जून मार्गावर गुडघाभर पाणी साचले. काहीशी अशीच परिस्थिती शहराच्या बसस्थानक, ईडीसी पाटो प्लाझा, मळा, भाटले, सांतीइनेज, कांपाल, मिरामार आदी भागातही दिसून आली व लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. गुरुवारी अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसानी सहन करावी लागली. गटारस्वच्छतेच्या अभावातून ही परिस्थिती उद्भवल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंगळवार आणि बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे राजधानीत अक्षरश: पूरसदृश स्थिती निर्माण झाली. त्यातून शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले.
त्यातून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. मोसमातील पहिल्याच पावसाने निर्माण केलेल्या या परिस्थितीचा कोणतीही यंत्रणा सामना करू न शकल्यामुळे पणजीवासीयांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तसेच यापुढे कोसळणाऱ्या पावसात काय होईल याबद्दल अनेकांनी भीतीही व्यक्त केली.
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे जनतेला त्रास
स्मार्ट सिटी प्रकल्पाचा भाग म्हणून राजधानीत चाललेल्या शेकडो कोटी ऊपयांच्या स्मार्टनेस कामांमुळे नागरिकांच्या त्रासात प्रचंड भर पडली आहे. राजधानीच्या बाहेर बांबोळी भागात गोमेकॉसमोरील भुयारी मार्गात पाणी साचले असून तशीच परिस्थिती मुख्य राष्ट्रीय महामार्गावरही निर्माण झाली होती.
कृष्णकृत्त्ये लपविण्यासाठी धो धो पावसात दुरुस्ती
नुकत्याच पार पडलेल्या जी20 जागतिक परिषदेसाठी अत्यंत घाईगडबडीत हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आलेल्या शहरातील रस्त्यांनीही पहिल्याच पावसात आतील अंग दाखविण्यास सुऊवात केली आहे. पावसाच्या माऱ्यामुळे अनेक ठिकाणी डांबर उखडून तेथे तळ्या निर्माण झाल्या. रात्रीच्या अंधारात करण्यात आलेले हे डांबरीकरण म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस ठरला असून ही कृष्णकृत्ये लपविण्यासाठी गुऊवारी धो धो कोसळणाऱ्या पावसात ठिकठिकाणी डागडुजी, दुऊस्तीकामे हाती घेण्यात आली होती. मात्र पावसाच्या माऱ्यामुळे तीही कामे धड होत नसल्याचे पाहणीत दिसून आले आहे.