पुणे / प्रतिनिधी :
भारतीय लष्कराच्या उच्च पदावर काम करताना देशाने लढलेल्या दोन्ही लढायांमध्ये गौरवास्पद व अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल सिक्कीम विश्वविद्यालयाचे कुलगुरू लेफ्टनेंट जनरल (निवृत्त) डॉ. डी. बी. शेकटकर यांचा ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि‘तर्फे रविवारी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
हा सत्कार समारंभ केवळ निमंत्रितांसाठी असून रविवार, 26 नोव्हेंबर 23 रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सकाळी 11 वाजता माजी लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी. टी. पंडित यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि‘चे संस्थापक-अध्यक्ष, तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर व उपाध्यक्ष अजित गरगट्टी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या निमित्ताने एस. एम. जोशी सभागृहातच सायंकाळी 5 वाजता स्वरसंध्या ही हिंदी व मराठी गीतांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. त्यात रसिका जोशी व अभिजित वाडेकर यांच्या स्वरसाज असणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रथम येण्रायास प्राधान्य या तत्त्वावर हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
डॉ. डी. बी. शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय लष्कराच्या सुधारणेसाठी समिती नेमण्यात आली होती. भारतीय सैन्यातील अभिमानास्पद कामगिरी, अंतर्गत सुरक्षा, नक्षलवाद या व अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सोळाहून अधिक पुस्तकांचे लेखक, मान्यवर विद्यापीठांमध्ये विविध अध्यासनाचे प्रमुख व सल्लागार समितीमध्ये सन्माननीय सदस्य म्हणून सुरू असलेली आपली वाटचाल ही पथदर्शी व प्रेरणादायी आहे. निवृत्तिनंतरही शेकटकर यांनी संरक्षण लविषयक महत्त्वांच्या तीन विषयांमध्ये संशोधन पूर्ण करीत पी.एचडी मिळवली आहे हे विशेष.
या अनुषंगाने श्री. शेकटकर यांचा ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि‘तर्फे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे, असे लोकमान्य सोसायटी पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव यांनी सांगितले.