बेळगाव : वेतनाविना आपल्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आपले वेतन थकले असून, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे मुश्कील बनले आहे. वेतन होत नसल्याच्या कारणाने दोन ग्रंथपालानी आत्महत्या केली असून, आतातरी विभागाने जागे होणे गरजेचे आहे. मृताच्या कुटुंबीयांना भरपाई देऊन त्यांना अनुकंपा तत्वावर रुजू करून घ्यावे. त्याचबरोबर ग्रंथपालांचे वेळेवर वेतन करण्याची मागणी ग्राम पंचायत ग्रंथपाल व माहिती साहाय्यक संघाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत सीईओना देण्यात आले.
ग्रंथपालांचे कनिष्ठ वेतन एकच हप्त्यामध्ये देण्यात यावे. प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला ग्रंथपालांच्या खात्यावर वेतन जमा करावेत. 13 ते 14 महिन्यांपासून असलेली बाकी रक्कम त्वरित जमा करावी. 20 ते 35 वर्षापासून कार्यरत असलेल्यांना कायम करून घ्यावेत, निवृत्तीनंतर पेन्शन व ग्रॅच्युएटी देण्यात यावी, आत्महत्या केलेल्या किंवा सेवेवर असताना मृत झालेल्या कुटुंबीयांच्या सदस्याला अनुकंपातत्वाद्वारे रुजू करून घ्यावे, सुटी असलेल्यादिवशी ग्रंथपालांना कोणतीही कामे देण्यात येऊ नये, अशी मागणीही करण्यात आली.









