युक्रेनमध्ये परतले युद्धाचे नायक : रशियाकडून आक्षेप
वृत्तसंस्था/ कीव्ह
रशिया-युक्रेन युद्धाला आता 500 दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी तुर्कियेतून 5 युक्रेनियन कमांडर्सना मायदेशी परत आणण्यास यश मिळविले आहे. हे कमांडल मागील वर्षी मारियुपोलच्या एजोवस्तल स्टील प्रकल्पात तैनात होते आणि त्यांनी 3 महिन्यांपर्यंत रशियाच्या सैन्याला झुंजविले होते. या कमांडर्सना युक्रेनचे सिंह किंवा युद्धनायक देखील म्हटले जाते
रशियाने युक्रेनच्या कमांडर्सच्या मुक्ततेला विरोध दर्शविला आहे. कमांडर्सच्या मुक्ततेला रशियाने प्रिझनर स्वॅप अॅग्रिमेंटचे (कैदी अदलाबदली करार) उल्लंघन ठरविले आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये तुर्कियेने रशिया आणि युक्रेनदरम्यान कैद्याच्या अदलाबदलीसाठी करार घडवून आणला होता. याच्या बदल्यात तुर्कियेने युद्ध संपेपर्यंत युक्रेनच्या सैनिकांना अंकारा येथे ठेवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते.
डेनिस प्रोकोपेंको, स्वेयातोस्लाव पालमार, सेरहीय वोलिंस्की, ओलेह खोमेंको, डेनिस श्लेहा अशी या मुक्तता झालेल्या कमांडर्सची नावे आहेत. तुर्कियने कराराच्या अंतर्गत कैद्यांना युद्ध संपेपर्यंत स्वत:च्या भूमीत ठेवण्याचे आश्वासन दिले होते. तुर्कियेने सैनिकांच्या मुक्ततेची पूर्वकल्पना दिली नसल्याचा आरोप रशियाने केला आहे. तुर्कियेवर नाटोच्या अन्य देशांनी याकरता दबाव आणला होता असे रशियाचे म्हणणे आहे.
आम्ही युद्धाच्या नायकांना मायदेशी परत आणले आहे. हे लोक आता स्वत:च्या कुटुंबासमवेत राहू शकतील. याकरता मी तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगान यांचे आभार मानतो. पुढील काळात देखील आम्ही आमच्या सैनिकांना मायदेशी परत आणण्याचे सत्र सुरूच ठेवू असे उद्गार युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी काढले आहेत.
मागील वर्षी 24 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यावर रशियाने मारियुपोल शहरावर हल्ला केला होता. 3 महिन्यांपर्यंत या शहरात चाललेल्या संघर्षात युक्रेनच्या हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला होता. यानंतर 17 मे रोजी सरकारच्या सूचनेनुसार युक्रेनियन सैनिकांनी शरणागती पत्करली होती. रशियाने युक्रेनच्या सैनिकांना कैदेत ठेवले होते. तर सप्टेंबर महिन्यात तुर्कियेने रशिया-युक्रेन यांच्यात कैद्यांच्या अदलाबदलीसाठी करार घडवून आणला होता. याच्या अंतर्गत युक्रेनच्या सैनिकांना अंकारा येथे हलविण्यात आले होते.









