वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लवकरच शेअर बाजारात आपला आयपीओ सादर करणार असल्याची माहिती आहे. याचदरम्यान या आठवड्यात बाजारात दोन कंपन्यांचे आयपीओ लाँच होणार आहेत.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स यांनी आपल्या आयपीओकरीता आवश्यक असणारा अर्ज बाजारातील नियामक सेबीकडे शुक्रवारी सुपूर्द केल्याची माहिती आहे. या आयपीओतून कंपनीने येणाऱ्या काळात 15 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उभारणार असल्याचे समजते. सदरचा आयपीओ हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत असणार आहे. यात कंपनी 10.18 कोटी इतके समभाग विकू शकते, असेही म्हटले जात आहे.
पाचवा मोठा आयपीओ
आयपीओ आणण्याचा निर्णय कंपनीने ह्युंडाई मोटर इंडियाच्या यशस्वी बाजारातील लिस्टींगनंतर घेतला आहे. ह्युंडाई मोटर इंडिया यांचा 27,870 कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात लिस्ट झाला. ऑक्टोबरमध्ये दाखल झालेला हा आयपीओ देशातला मूल्याच्या तुलनेतला सर्वात मोठा आयपीओ होता. यानंतर आता एलजी यांचा आयपीओ बाजारात दाखल होत असून तो 5 वा मोठा आयपीओ ठरु शकतो. याआधी कोल इंडिया या कंपनीने 15,200 कोटी रुपयांचा आयपीओ सादर केला होता.
ह्युंडाईचा आयपीओ आणि वेळ
ह्युंडाईचा आयपीओ मोठा असला तरी त्याला मिळताजुळता प्रतिसाद मिळाला होता. आयपीओ फक्त 2.4 पट इतकाच सबस्क्राइब झाला होता. यांचा आयपीओ चुकीच्या वेळी आल्याचे तज्ञ सांगतात. आयपीओ आला तेव्हा दक्षिण कोरीयातील स्थिती अस्थिरतेची होती. दक्षिण कोरीयातील या कंपनीची भारतात स्पर्धा वोल्टास, हॅवेल्स, गोदरेज, ब्लू स्टार, हायर, व्हर्लपूल, फिलीप्स, सॅमसंग आणि सोनी या कंपन्यांसोबत आहे.
कंपनीची वाटचाल
तसे पाहता भारतात एलजीने आपल्या उत्पादनांप्रती चांगली लोकप्रियता मिळवलेली आहे. टीव्ही, फ्रीज असो की वॉशिंग मशीन याबाबतीत एलजीची लोकप्रियता घराघरात पाहायला मिळते. ग्राहकोपयोगी उत्पादने व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने यांच्याबाबतीत पाहता सॅमसंग यांच्यानंतर एलजीचा दुसरा नंबर लागतो. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने 21,352 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. या क्षेत्रात तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी अनुक्रमे, हॅवल्स इंडिया व गोदरेज अँड बॉयस या आहेत. आपल्या अर्जात कंपनीने म्हटले आहे की आम्ही देशात घरगुती उपकणांच्या आणि ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या विक्रीत नंबर वनवर आहोत. सलग 13 वर्षात बाजारातील हिस्सा मिळवण्यात एक नंबरवर राहिलो आहोत.
या कंपन्यांचे येणार आयपीओ
याचदरम्यान या आठवड्यात विशाल मेगामार्ट, मोबीक्वीक यांचे आयपीओ बाजारात लाँच होणार आहेत. विशाल मेगामार्टचा आयपीओ 11 डिसेंबरला खुला होणार असून 13 डिसेंबरपर्यंत त्यात गुंतवणूक करता येणार आहे. 74-78 अशी आयपीओची इशु किंमत कंपनीने जाहीर केली आहे. गुंतवणूकदारांना 190 समभागांसाठी बोली लावता येणार आहे. 18 डिसेंबरला हा आयपीओ बीएसई, एनएसईवर लिस्ट होईल.
याचप्रमाणे मोबीक्वीक यांचाही आयपीओ 11 डिसेंबरला खुला होणार असून 13 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. 20501792 इतके ताजे समभाग कंपनी सादर करणार आहे. 265 रुपये ते 279 रुपये अशी समभागाची इशु किंमत कंपनीने निश्चित केली आहे. कमीतकमी 53 समभाग खरेदी करावे लागणार आहेत. 18 डिसेंबर रोजी कंपनीचे समभाग बीएसई, एनइसईवर लिस्ट होऊ शकतात.









