पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणात धाडी : ममता बॅनर्जींच्या मंत्र्यांच्या घरावर ईडीचे छापे, द्रमुक खासदार आणि बीआरएस आमदारांच्या निवासस्थानांवर प्राप्तिकर विभागाची कारवाई
वृत्तसंस्था /कोलकाता, चेन्नई, हैदराबाद
भ्रष्टाचाराशी संबंधित विविध प्रकरणांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी आपली कारवाई तीव्र केली आहे. गुऊवारी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि प्राप्तिकर विभागाने (आयटी) पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि तेलंगणातील सत्ताधारी पक्षांच्या खासदार आणि आमदारांच्या अनेक निवासस्थानांवर छापे टाकले. छाप्यात लक्ष्य करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये ममता सरकारचे मंत्री रथीन घोष, तामिळनाडू द्रमुकचे खासदार एस जगतरक्षकन आणि तेलंगणाचे बीआरएस आमदार मागंती गोपीनाथ यांचा समावेश आहे. याशिवाय बंगालच्या माजी पालिका अधिकाऱ्याच्या घरावरही धाड टाकण्यात आली.
पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंत्री रथीन घोष यांच्या निवासस्थानासह कोलकाता आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील त्यांच्याशी संबंधित 12 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. टीटागड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष प्रशांत चौधरी यांच्या घरावरही गुरुवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. उत्तर 24 परगणा येथील बंगाल सरकारमधील मंत्री रथीन घोष यांच्या निवासस्थानी ईडी अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी सकाळीच दाखल झाले होते. दिवसभर त्यांच्या निवासासह अन्य ठिकाणी कागदपत्र आणि मालमत्ता दस्तावेजांची तपासणी सुरू होती. या छाप्यावेळी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तामिळनाडूत चेन्नईतील द्रमुक खासदार एस जगतरक्षकन यांच्या 40 हून अधिक ठिकाणांची झडती घेण्यात आली. तर, तेलंगणात हैदराबादमध्ये आयटी अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या बीआरएस आमदार मागंती गोपीनाथ यांच्यावर कारवाई केली आहे. प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या पथकाकडून हैदराबादमधील ज्युबली हिल्स, कुकटपल्ली, गचिबोवलीसह बीआरएस आमदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली.
उत्तर प्रदेशात 20, मध्यप्रदेशात 15 ठिकाणी छापे
प्राप्तिकर विभागाने उत्तर प्रदेशातील कानपूर येथील मयूर ग्रुप या मोठ्या वनस्पती तेल कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरसह राज्यात सुमारे 20 आणि मध्य प्रदेशातील 15 ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत दीडशेहून अधिक अधिकारी सहभागी झाले होते. गुऊवारी सकाळी सहा वाजता पथके दाखल झाली होती. कारवाईवेळी सर्व परिसर सील करण्यात आला होता. सुमारे एक हजार कोटी ऊपयांची करचोरी झाल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मयूर ग्रुपवर आयकर विभागाचा मोठा छापा
कानपूरमधील सिव्हिल लाईन्स येथे मयूर ग्रुपची पाच मजली आलिशान इमारत उभारण्यात आली आहे. येथेच गुरुवारी सकाळी 20 ते 25 प्राप्तिकर अधिकाऱ्यांची टीम दाखल झाली होती. या आलिशान घरात कंपनीचे दोन्ही संचालक उपस्थित असताना प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. मयूर ग्रुपतर्फे वनस्पती तेल, खाद्यपदार्थ आणि पॅकेजिंगचा व्यवसाय केला जातो. या व्यवसायाच्या माध्यमातून करचोरी सुरू असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर छापे टाकण्यात आले. कानपूर देहाटच्या रानिया भागात मयूर ग्रुपचा सर्वात मोठा कारखाना आहे. मयूर ग्रुपने कारखान्याच्या आजूबाजूला 1000 एकरहून अधिक जमीन खरेदी केली आहे.









