ऑनलाईन टीम / पुणे :
आर्यनमॅन अशी ओळख असलेले पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (ips krishna prakash) यांच्यासाठी जमीन व्यवहारातून तब्बल 200 कोटींची वसुली करण्यात आल्याचा दावा करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावे हे पत्र असून, ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या पत्राची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
अशोक डोंगरे यांच्या नावे असलेल्या या पत्रात चार सहाय्यक पोलीस आयुक्त, चार वरि÷ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणी कृष्ण प्रकाश यांच्यासाठी 200 कोटी पेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा एका पत्रातून करण्यात आला असून, ते पत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.
या पत्रात डोंगरे यांनी जीवाला धोका असल्याचा दावा करत कृष्णप्रकाश यांच्यासाठी जमिनीच्या व्यवहाराचे पैसे गोळा करावे लागले. ही रक्कम 200 कोटींची असल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक पत्रकारांनाही कृष्ण प्रकाश यांनी पैसे पुरवले. त्या बदल्यात कृष्ण प्रकाश यांची प्रतिमा संवर्धनाचे काम पत्रकार करत होते असंही या पत्रात सांगण्यात आलं आहे. या पत्रावर डोंगरे यांचं अर्जदार म्हणून नाव आहे. मात्र, प्रत्यक्षात हे पत्र आपण लिहिलं नाही, असा दावा डोंगरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.








