महापौर–उपमहापौर निवडणूक : कार्यकाळ संपून सहा दिवस उलटले तरी निवडणूक घोषणा नाही
प्रतिनिधी / बेळगाव
विद्यमान महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांचा कार्यकाळ 14 फेब्रुवारी रोजी संपला आहे. कार्यकाळ संपून सहा दिवस उलटले असले तरी प्रादेशिक आयुक्तांकडून निवडणूक घोषित करण्यात आलेली नाही. यापूर्वी मनपाच्या कौन्सिल विभागाकडून निवडणुकीचा सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी मनपाच्या सत्ताधारी गटाचे गटनेते गिरीश धोंगडी यांच्याकडूनही निवडणूक घेण्यासंदभृ प्रादेशिक आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. विद्यमान महापौर–उपमहापौरांचा कार्यकाळ 14 फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे यापूर्वीच मनपाच्या कौन्सिल विभागाकडून प्रादेशिक आयुक्त संजू शेटेण्णवर यांना निवडणुकीसंदभृ सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यातच खाऊकट्टा प्रकरणी दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने कौन्सिल विभागाकडून दोन नगरसेवकांना वगळून सध्याच्या उर्वरित मतदारांची माहिती प्रादेशिक आयुक्तांना पाठवून देण्यात आली आहे. 26 किंवा 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून निवडणुकीसंदभृ कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत. महापौर व उपमहापौरांचा कार्यकाळ संपून 6 दिवस उलटले असले तरी निवडणुकीची तारीख जाहीर न झाल्याने मनपातील सत्ताधारी गटाचे गटनेते गिरीश धोंगडी यांनी देखील आता प्रादेशिक आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयाकडे लागून राहिल्या आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी विविध स्थायी समितींच्या बैठका घेण्यात येत नाहीत. जोपर्यंत निवडणुकीची तारीख घोषित होत नाही तोपर्यंत स्थायी समितीच्या बैठका घेण्यास कोणतीच अडचण नसल्याने कौन्सिल विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.









