बळ्ळारी नाल्यावरील ‘त्या’ पाईपबाबत नियोजन करण्याची सूचना
बेळगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ची बांधणी केली. मात्र ही बांधणी करताना परिसरातील जनतेच्या समस्यांबाबत गांभीर्याने घेतले नाही. बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्यासाठी घालण्यात आलेले पाईप बुजल्यामुळे समस्या निर्माण झाली. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन मागणी केली होती. त्याची दखल प्रांताधिकाऱ्यांनी घेतली असून तातडीने नियोजन करावे आणि पाण्याचा निचरा होईल यासाठी पुढाकार घ्यावा, असे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवून दिले आहे. पुणे-बेंगळूर महामार्गावरील बळ्ळारी नाल्याचे पाणी निचरा होण्यासाठी पाईप घालण्यात आले. मात्र ते पाईप बुजून गेले आहेत. त्यामुळे लेंडी नाला परिसरातील शिवारामध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होत आहे. याचबरोबर शहरालाही पुराचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बुजलेले पाईप खुले करावेत, अशी मागणी महापालिकेकडे वारंवार केली. मात्र महापालिकेने दखल घेतली नाही. काहीवेळा दखल घेतली तरी तात्पुरते काम करण्यात आले. सदर काम हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आहे. त्यामुळे आता प्रांताधिकारी बलराम चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ही समस्या सोडविण्यासाठी पत्र पाठविले आहे. दरवर्षी यामुळे मोठे नुकसान होत आहे. तेव्हा ही समस्या सोडविण्यासाठी नियोजन करावे आणि शेतकऱ्यांसह बेळगाववासियांना दिलासा द्यावा, असे या पत्रात म्हटले आहे. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या पत्राची दखल घेणार का? हे पहावे लागणार आहे.
बळ्ळारी-लेंडी नाला समस्येची कृषीमंत्र्यांनी घेतली दखल : महानगरपालिकेला पाठविले पत्र, आतातरी दखल घेणार का?
बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्याची खोदाई करावी व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळावे, या मागणीसाठी बेळगाव शेतकरी संघटनेच्यावतीने कृषीमंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले होते. त्याची दखल घेत कृषीमंत्र्यांनी महापालिकेला शेतकऱ्यांच्या या मागणीबाबत विचारविनिमय करून समस्या दूर करण्यासाठी पत्र पाठविले आहे. यामुळे आता महानगरपालिका या कामाला लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्यामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी नुकसान होत आहे. हजारो एकर जमिनीमधील पिकांची हानी होत आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. बळ्ळारी नाल्याची खोदाई करावी, यासाठी अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी या मागण्यांसाठी गेल्या 10 वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. या समस्यांबाबत लघुपाठबंधारे खात्याला निवेदन दिले होते. तर लेंडी नाल्याच्या खोदाईसाठी महापालिकेला निवेदन दिले होते. मात्र त्याची दखल घेतली नाही. यामुळे शेवटी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांना निवेदने पाठविण्यात आली. आता कृषीमंत्र्यांनी दखल घेऊन महापालिकेला ही समस्या सोडविण्याबाबत पत्र पाठविले आहे. आता तरी महापालिका याकडे लक्ष देईल का? हे पहावे लागणार आहे.









