आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस : हक्क, कर्तव्यांबाबत हवी साक्षरता
प्रतिनिधी / पणजी
साक्षरता हा बदलत्या जीवनाचा मूळ पाया आहे. कोणत्याही देशाच्या विकासासाठी साक्षरता खूप महत्त्वाची आहे. देशाच्या विकासासाठी अधिकाधिक नागरिकांनी साक्षर होणे आवश्यक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि वैयक्तिक स्तरावरील व्यक्तीच्या जीवनातील मुख्य पैलूंपैकी साक्षरता एक आहे. कल्पना, विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी वाचणे आणि लिहिणे ही व्यक्तीची मूलभूत क्षमता आहे. देशातील नागरिक जेवढे साक्षर असतील, तेवढा देश प्रगती करू शकेल. साक्षरतेचे हे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो.
युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनद्वारे 1966 मध्ये साक्षरतेच्या महत्त्वाविषयी जागऊकता निर्माण करण्यासाठी आणि सार्वत्रिक साक्षरता प्राप्त करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यासाठी या दिवसाची स्थापना करण्यात आली.
समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने साक्षरता दिवस जगभरात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्याची सुऊवात 1966 सालापासून झाली. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि जगभरातील लोकांचे शिक्षणाकडे लक्ष वेधणे असा आहे. एक साक्षर आणि सक्षम समाज घडविण्यासाठी हा दिवस दरवषी साजरा केला जातो.
हक्कांविषयी आणि कर्तव्यांबाबत निरक्षर
भारतातही जागतिक साक्षरता दिवस हा महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून भारत साक्षरतेच्या दिशेने कौतुकास्पद काम करत आहे. साक्षरता हा शब्द साक्षर या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ वाचन आणि लिहिण्यास सक्षम असणे असा होतो. पण साक्षरता म्हणजे एवढेच नाही तर साक्षरता म्हणजे आपल्या हक्कांविषयी आणि कर्तव्यांविषयी जाणीव असणे. आपल्या समाजात साक्षर लोक तर आहेत परंतु आपल्या हक्कांविषयी आणि कर्तव्यांबद्दल अजूनही निरक्षरच आहेत. चांगले जीवन जगण्यासाठी साक्षरता खूप महत्त्वाची आहे. कारण निरक्षर माणूस स्वत:चा चांगला विचार करू शकत नाही, मग राष्ट्राच्या विकासात त्याचे काय योगदान देईल? असा प्रश्न निर्माण होतो.
गोव्यात 88.70 टक्के लोक आहेत साक्षर
शिक्षणाच्या माध्यमातून समाजात पसरलेल्या वाईट गोष्टी आणि अंधश्रद्धांपासून मुक्तता मिळू शकते. गोव्याची साक्षरता 88.70 टक्के आहे. ज्यात पुरूष साक्षरता 92.65 तर महिलांची 84.66 टक्के आहे. शिक्षणाच्या जोरावर गोव्याच्या ग्रामीण भागातील मुले विविध क्षेत्रात तसेच राज्याबरोबरच इतर देशात आपला नावलौकिक मिळवत आहे.
प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज
शिक्षणच माणसाला माणुसकीच्या दिशेने घेऊन जाते. कोणत्याही देशाचा सर्वात मोठा शाप म्हणजे तेथील रहिवाशांची निरक्षरता. आज आपण प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. कारण जेव्हा झाडाला मुळापासून सिंचन केले जाते, तेव्हाच झाड फुलते, नवीन तरूण पिढीला प्रेरणा देऊनच साक्षरतेचा खरा अर्थ समजू शकतो. सुशिक्षित तऊणांनी सक्रिय भूमिका बजावली तर सध्याची परिस्थिती सुधारली जाऊ शकते. सामाजिक दृष्टिकोनातूनही शिक्षण आवश्यक आहे. केवळ सुशिक्षित व्यक्तीच समाजाप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदाऱ्या समजून त्यांचा चांगला उपयोग करू शकते.









