नैऋत्य मोसमी वारे अर्थात मोसमी पाऊस यंदा सर्वसाधारण म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के होणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने दिलेला अंदाज शेतकऱयांसह समस्त देशवासियांसाठी दिलासादायक म्हणावा लागेल. भारतीय हवामान विभागाच्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजातून देशाच्या विविध विभागात पावसाचे प्रमाण कसे राहणार, याचा अदमास येत असतो. त्यामुळे संबंध देशाचे या प्रारंभिक अहवालाकडे लक्ष असते. स्कायमेट वा तत्सम संस्थांकडूनही अलीकडच्या काही वर्षांत अंदाज दिले जात असतात. तथापि, त्यांच्याकडे स्वतःची अशी हवामानविषयक यंत्रणा नाही अथवा असली, तरी तिला मर्यादा आहेत. स्वाभाविकच त्यांचे अंदाज मर्यादित वा विश्लेषणाच्या पातळीवरच राहतात. त्यामुळे आजही भारतीय हवामान विभाग वा आयएमडीचा अंदाज हाच अधिकृत मानला जातो. किंबहुना, स्कायमेटसारख्या संस्थांचा अंदाजही नक्कीच वातावरणनिर्मिती करणारा ठरत असतो. या वर्षी आयएमडीच्या एक दिवस आधी प्रसृत झालेला त्यांचा अहवाल काहीसा चिंताजनक ठरावा. जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत 816.5 मिमी अर्थात सरासरीच्या 94 टक्के पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. म्हणजेच मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहील, असे भाकीत ही संस्था वर्तविते. यंदाचे वर्ष एल निनोचे असल्याचे बोलले जाते. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून कमी बरसतो, असे गृहीतक आहे. जेव्हा जेव्हा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहिला आहे, त्यावर्षी देशात कमी पावसाची नोंद झाल्याकडे स्कायमेटचा अहवाल लक्ष वेधतो. परंतु, आयएमडीचा अहवाल यास छेद देताना दिसतो. यावर्षीच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असला, तरी सरासरीच्या 96 टक्के पाऊस होऊ शकेल, असे भारतीय हवामान विभाग म्हणतो. विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या ला निना स्थिती आहे. मॉन्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टिम आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मान्सूनमध्ये एल निनो स्थिती तयार होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. मोसमी पावसाच्या दुसऱया टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये एल निनोचा प्रभाव जाणवण्याची चिन्हे आहेत. ही काहीशी नकारात्मक बाब असली, तरी सर्वच एल निनो वर्षे मॉन्सूनसाठी प्रतिकूल नसतात. 1951 ते 2022 पर्यंतच्या नोंदींकडे दृष्टीक्षेप टाकला, तर 40 टक्के एल निनो वर्षांमध्ये मॉन्सूनचा पाऊस हा सर्वसाधारण राहिला असल्याचे दिसून येते. आयएमडीने हाच मुद्दा उपस्थित करीत आगामी हंगामही सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील तापमानाचा फरक सध्या सर्वसाधारण अवस्थेत आहे. मॉन्सून हंगाम पॉझिटिव्ह अवस्थेत राहण्याची शक्यता आहे. ही स्थिती मोसमी पावसाकरिता पोषक मानण्यात येते. दुसऱया बाजूला उत्तर गोलार्धातील युरेशियात फेब्रुवारी, मार्चमध्ये या वर्षी हिमाच्छादन कमी प्रमाणात होते. ही अवस्थाही भारतीय मॉन्सूनकरिता अनुकूल असते. वरील बाबींचा विचार करता मोसमी पावसाकडून चालू वर्षीही आशा ठेवायला हरकत नाही. वास्तविक मॉन्सून ही भारतासारख्या देशाला मिळालेली देणगीच होय. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे देशातील तीन मुख्य ऋतू. यातील जून ते सप्टेंबर हा कालावधी पाऊसपाण्याचा. भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी हा अतिशय महत्त्वाचा काळ. प्रारंभीच्या टप्प्यात नांगरणी, पेरणीची कामे झाल्यानंतर पावसाच्या छत्रछायेमुळेच भुईतून कोंब उगवतात. पावसाचा प्रत्येक थेंब त्यांना नवा जोम देतो. पिके डोलू लागतात नि दाण्यांनी लगडतात. बघता बघता सराई अर्थात समृद्धी येते. त्या अर्थी पाऊस हे समृद्धीचे प्रतीक. आजही देशातील 65 टक्के जनता शेतीवर अवलंबून असल्याचे दिसते. त्यातून भारतीय मान्सूनचे महत्त्व ध्यानी यावे. मुख्य चार महिन्यांमध्ये देशभरात सर्वसाधारणपणे 87 सेमी इतका पाऊस बरसत असतो. यावर्षी हा पाऊस 83 सेमीपर्यंत पडण्याची शक्यता असून, दक्षिण, लगतचा पूर्व भाग, पूर्वोत्तर भारतात तसेच वायव्य भारताच्या काही भागात यंदा सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. या भागासाठी ही आनंदवार्ताच. मात्र, वायव्य भारत, पश्चिम मध्य भारत, पूर्वोत्तर भारताच्या तुरळक भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील. तसेच महाराष्ट्र-गोव्याचा बहुतांश भाग, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर तेलंगणा, गोवा तसेच पूर्वोत्तर भारतातील काही भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्याने त्यादृष्टीने आधीपासूनच नियोजन करणे क्रमप्राप्त ठरते. मागच्या आठ ते दहा वर्षांचा विचार केला, तर ती पावसाच्या दृष्टीने उत्तम वा चांगली गेली आहेत. ही स्थिती यापुढेही तशीच राहील, असे समजून कोणत्याही राज्याने गाफील राहू नये. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सुयोग्य वापर व्हायला हवा. त्याचबरोबर हंगामात पावसाचा प्रत्येक थेंब कसा साठवता येईल, यावर लक्ष केंद्रित करायला हवे. मागच्या अनेक वर्षांपासून जगभर ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा होत आहे. ढगफुटी, अतिवृष्टी, समुद्र पातळीतील घट, हिमनद्यांच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका, थंडी वा उष्णतेच्या तीव्र लाटा हे सारे जागतिक तापमानवाढीचेच परिणाम मानले जात आहेत. वाढते शहरीकरण व पर्यावरणाचा ऱहास हाच या सगळय़ा समस्यांच्या मुळाशी असल्याचे पहायला मिळते. मागच्या एक ते दीड महिन्यांतील तापमानाचा अभ्यास केला, तरी बदलत्या वातावरणाची प्रचिती यावी. ऐन मार्च एंडिंगमध्ये दुपारी कडक उन्हाळा, संध्याकाळी पावसाळा नि रात्री व सकाळी थंडीची तीव्रता अनुभवायला मिळणे, या साऱयातून नैसर्गिक चक्र कशा पद्धतीने बिघडत चालले आहे, याचेच दर्शन घडते. वातावरणातील हा बिघाड टाळायचा असेल, तर कार्बन उत्सर्जन कमी करावे लागेल. देशातील, जगातील नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमधूनच निसर्गचक्र सुरळीत होऊ शकते. तूर्तास मान्सूनपूर्व व मान्सूनोत्तर नियोजनासाठी सज्जता हवी.
Previous Articleताकसुद्धा फुंकून प्यावं…
Next Article सिडनीतील तरंगणारे आलिशान घर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








